बँकॉक चॅम्पियनशिप स्पर्धेत पटकावली चार सिल्वर आणि एक ब्राँझ मेडल
संतोष कोत्रे
लांजा –: लांजा तालुक्यातील आरगावचा सुपुत्र, बाल जलतरणपटू रेयांश दीपक खामकर याने थायलंड येथे झालेल्या एशियन ओपन स्कूल स्विमिंग चॅम्पियनशिप बँकॉक या स्पर्धेत चार सिल्वर आणि एक ब्रांझ अशा एकूण पाच पदकांची कमाई करत लांजा तालुक्याचेच नव्हे तर संपूर्ण भारत देशाचे नाव रोशन केले आहे.
एशियन ओपन स्कूल स्विमिंग चॅम्पियनशिप, बँकॉक थायलंड येथे ही स्पर्धा दिनांक २९ आणि ३० ऑगस्ट २०२६ रोजी पार पडली. या स्पर्धेत लांजा तालुक्याचा सुपुत्र असलेल्या रेयांश खामकर याने दैदीप्यमान कामगिरी करताना पाच पदकांची कमाई केली. यामध्ये २५ मीटर बटरफ्लाय जलतरण स्पर्धेत सिल्वर मेडल, ५० मीटर बटरफ्लाय जलतरण स्पर्धेत सिल्वर मेडल, ५० मीटर बॅकस्ट्रोक जलतरण स्पर्धेत सिल्वर मेडल, ५० मीटर फ्रीस्टाइल जलतरण स्पर्धेत सिल्वर मेडल आणि १०० मीटर फ्रीस्टाइल जलतरण स्पर्धेत ब्रांझ मेडल अशा एकूण पाच पथकांची कमाई करताना संपूर्ण भारत देशाचे नाव रोशन केले आहे.
लांजा तालुक्याचा सुपुत्र असलेला रेयांश दिपक खामकर याने स्टारफिश स्पोर्ट्स फाउंडेशनचे प्रशिक्षक कैलास आखाडे यांच्या मार्गदर्शनाखाली नेत्रदीपक कामगिरी करीत विश्वविक्रमावर आपले नाव कोरले आहे. बालवयात त्याने जलतरण स्पर्धा गाजविल्या आहेत. जलतरण मधील असलेल्या त्याच्या चमकदार कामगिरीची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने देखील यापूर्वीच नोंद घेतलेली आहे. तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते देखील रेयांश खामकर याचा सत्कार करण्यात आला होता.
दि.१५ नोव्हेंबर २०२५ रोजी सिंधुदुर्ग येथे झालेल्या सागरी जलतरण स्पर्धेत अवघ्या ७ वर्षे २ महिन्याच्या रेयांशने अरबी समुद्रात ३० किलोमीटरचे अंतर ७ तास ३० मिनिटे ११ सेकंदात पूर्ण केले होते. अशी कामगिरी करणारा जगातील सर्वात लहान जलतरणपटू होण्याचा विश्वविक्रम रेयांश याने केला आहे.
दरम्यान, बँकाॅ़क, थायलंड येथील स्पर्धेत चमकदार कामगिरी करत चार सिल्वर आणि एक ब्रांझ अशी पाच पदके पटकावलेल्या रेयांश खामकर याच्यावर या शानदार कामगिरी बद्दल अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्याचे चंद्रकांत तथा दादा खामकर, पंचायत समिती सदस्य आणि भाजपा तालुकाध्यक्ष शैलेश खामकर, जिल्हा बँक संचालक महेश खामकर
आदींनी अभिनंदन केले आहे.













