नाणारमधील बॉक्साईट ब्लॉक प्रकल्पाची ७ सप्टेंबरची जनसुनावणी रद्द; जिल्हादंडाधिकाऱ्यांचे आदेश

राजापूर : प्रतिनिधी 
राजापूर तालुक्यातील मौजे नाणार येथे नियोजित असलेल्या बॉक्साईट खाण प्रकल्पाच्या अनुषंगाने आयोजित करण्यात आलेली पर्यावरण विषयक जाहीर जनसुनावणी प्रशासनाकडून रद्द करण्यात आली आहे. मे. सोशीयेदादे दि फोमेंटो इंडस्ट्रियल प्रायव्हेट लिमिटेड (मडगाव, गोवा) या कंपनीच्या १४४.९५ हेक्टर क्षेत्रावरील ‘नाणार बॉक्साईट ब्लॉक’ प्रकल्पासाठी ही जनसुनावणी ७ सप्टेंबर २०२६ रोजी होणार होती. मात्र, स्थानिक जनतेचा तीव्र विरोध आणि कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती लक्षात घेऊन ही सुनावणी रद्द करण्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी मनुज जिंदल यांनी जारी केले आहेत.

या प्रकरणी नाटे सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक तसेच राजापूरचे उपविभागीय अधिकारी यांनी जिल्हा प्रशासनाकडे वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर केला होता. येत्या १४ सप्टेंबर २०२६ पासून गणेशोत्सव सुरू होत असून, उत्सवासाठी मोठ्या प्रमाणावर चाकरमानी गावागावांत दाखल होत आहेत. त्यातच या प्रस्तावित बॉक्साईट प्रकल्पाला आणि त्याच्या जनसुनावणीला स्थानिक लोकांचा जोरदार विरोध आहे. अशा पार्श्वभूमीवर जनसुनावणी घेतल्यास कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची दाट शक्यता पोलीस व महसूल प्रशासनाने वर्तवली होती.

या अहवालाची गंभीर दखल घेत जिल्हा प्रशासनाने ७ सप्टेंबर रोजी होणारी सुनावणी रद्द करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाची अधिकृत माहिती पत्राद्वारे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या रत्नागिरी उप प्रादेशिक अधिकाऱ्यांना देण्यात आली असून, राजापूरच्या उपविभागीय दंडाधिकारी व कार्यकारी दंडाधिकाऱ्यांनाही या आदेशाची प्रत रवाना करण्यात आली आहे. प्रशासनाच्या या निर्णयामुळे सध्या परिसरातील वातावरण शांत झाले आहे.