शेतकरी संघटनेचे अध्यक्ष श्यामसुंदर राय यांच्यासह शेतकऱ्यांचे जिल्हा कृषी अधीक्षकांना निवेदन
वेंगुर्ले : प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्ह्याची भौगोलिक रचना लक्षात घेता ई-पिक पाहणीची प्रक्रिया शेतकरी स्तरावर सुलभ करून त्यासाठी किमान एक महिन्याची मुदतवाढ द्यावी, अशी मागणी छत्रपती शिवाजी महाराज सिंधुदुर्ग शेतकरी संघटनेचे अध्यक्ष श्यामसुंदर राय यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी जिल्हा कृषी अधीक्षक आणि निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
चालू वर्षापासून शासनाने गावागावांत सहाय्यकांमार्फत ई-पिक पाहणी करण्याची व्यवस्था केली आहे. मात्र, प्रत्यक्षात जिल्ह्यातील अनेक ठिकाणी ई-पिक पाहणीची प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. सिंधुदुर्गातील भौगोलिक परिस्थिती, विखुरलेली शेती आणि शेतकऱ्यांच्या छोट्या-छोट्या क्षेत्रांमुळे ही पाहणी वेळेत पूर्ण करण्यात अडचणी येत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
एका शेतकऱ्याच्या सात-आठ ठिकाणी जमिनीचे छोटे-छोटे प्लॉट असून काही प्लॉट १० ते २० गुंठ्यांचे आहेत. अशा परिस्थितीत प्रत्येक ठिकाणी सहाय्यकांकडून ई-पिक पाहणी करणे शक्य होत नसल्याने अनेक शेतकरी या प्रक्रियेपासून वंचित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे ई-पिक पाहणीची नोंद गतवर्षीपेक्षा कमी होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
तसेच शेतकरी स्तरावर ई-पिक पाहणी करण्यासाठी किमान एक महिन्याची मुदत द्यावी, अन्यथा शेतकरी विविध शासकीय योजनांपासून वंचित राहू शकतात. भात खरेदी केंद्रावर धान विक्री, फळबाग लागवड तसेच इतर योजनांचा लाभ घेण्यासाठी ई-पिक पाहणीची नोंद आवश्यक असल्याने शासनाने या अटीमध्ये शिथिलता आणावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
फळझाडांची ई-पिक पाहणी दर तीन वर्षांनी न करता पाच वर्षांनी करावी, तसेच सातबारा उताऱ्यावर इतर खातेदारांची अट ठेवू नये, अशीही मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. ई-पिक पाहणी एकदाच करून घेण्याबाबतही शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन पालकमंत्री नितेश राणे यांनी या मागण्यांकडे लक्ष देऊन तातडीने योग्य निर्णय घ्यावा, अशी मागणी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष श्यामसुंदर राय व प्रशांत गोलम, उदय गावडे, रमेश पांगम, सतीश माळकर, विठ्ठल आरोसकर, उत्तम नाईक, राजन आरोस्कर, प्रदीप सावंत, सुधीर परब, सुभाष भगत, रमाकांत पेडणेकर, निवृत्ती परब, संदीप देसाई, अर्जुन नाईक, प्रकाश वारंग यांच्यासह शेतकऱ्यांनी केली आहे.













