भंडारी समाजाचा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी राज्यस्तरीय निबंध स्पर्धा..

भंडारी समाज : इतिहास, वर्तमान आणि भविष्याचा वेध’ या विषयावर लेखणीला मिळणार वैचारिक व्यासपीठ

वेंगुर्ले : प्रतिनिधी

समाजाचा इतिहास जतन करणे, वर्तमानाचे वस्तुनिष्ठ विश्लेषण करणे आणि भविष्याची दिशा निश्चित करण्यासाठी वैचारिक लेखनाला चालना देण्याच्या उद्देशाने भंडारी समाज ऐक्यवर्धक मंडळ, वेंगुर्ला यांच्या वतीने “भंडारी समाज : इतिहास, वर्तमान आणि भविष्याचा वेध” या विषयावर राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

भंडारी समाजाची गौरवशाली परंपरा, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व आर्थिक क्षेत्रातील योगदान, बदलत्या काळातील आव्हाने आणि नव्या संधी यांचा अभ्यासपूर्ण वेध घेण्यासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या माध्यमातून समाजाच्या इतिहासाचा अभ्यास, वर्तमानाचे चिकित्सक विश्लेषण आणि भविष्याविषयी विधायक विचार मांडण्यास प्रोत्साहन मिळणार आहे.

सदर स्पर्धा सर्वांसाठी खुली असून निबंध मराठी भाषेत, स्व:हस्ताक्षरात आणि स्वतःच्या मौलिक विचारांवर आधारित असावा. किमान शब्द मर्यादा एक हजार शब्द असून परीक्षकांचा निर्णय अंतिम व बंधनकारक राहील.

स्पर्धेतील विजेत्यांना प्रथम क्रमांक ₹२५०१, द्वितीय ₹२००१, तृतीय ₹ १५०१, उत्तेजनार्थ प्रथम ₹१००१ आणि उत्तेजनार्थ द्वितीय ₹५०१ अशी रोख पारितोषिके प्रदान करण्यात येणार असून, सर्व विजेत्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.

निबंध सादर करण्याची अंतिम तारीख ५ सप्टेंबर २०२६ असून निबंध भंडारी समाज ऐक्यवर्धक मंडळ, वेंगुर्ला, c/o प्रा. डॉ. सचिन वासुदेव परुळकर, मुक्काम – पोस्ट तुळस, ता. वेंगुर्ले, जि. सिंधुदुर्ग – ४१६५१५ या पत्त्यावर टपालाने किंवा प्रत्यक्ष जमा करावेत. अधिक माहितीसाठी प्रा. डॉ. सचिन वासुदेव परुळकर (मो. ९४२१२३८०५३) यांच्याशी संपर्क साधावा.

समाजाचा इतिहास आणि सांस्कृतिक वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे, समाजजीवनाविषयी अभ्यासपूर्ण लेखनाला प्रोत्साहन देणे आणि समाजाच्या भावी वाटचालीसंदर्भात विधायक विचार पुढे येण्यासाठी ही स्पर्धा निश्चितच महत्त्वपूर्ण ठरेल. राज्यभरातील विद्यार्थी, शिक्षक, संशोधक, साहित्यप्रेमी तसेच समाजातील सर्व घटकांनी या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन भंडारी समाज ऐक्यवर्धक मंडळ, वेंगुर्लाचे अध्यक्ष तथा माजी प्राचार्य डॉ. आनंद बांदेकर यांनी केले आहे.