मेघा इंगावले यांचे प्रमुख उपस्थितीत दळवटणे गणातील मुख्याध्यापक व शिक्षकांची बैठक उत्साहात

शिक्षक वर्गाने केले पंचायत समिती सदस्यांचे कौतुक

चिपळूण (प्रतिनिधी) : दळवटणे पंचायत समिती गणातील शाळांच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेण्यासाठी पंचायत समिती सदस्या मेघा योगेश इंगावले यांच्या पुढाकाराने गणातील मुख्याध्यापक व शिक्षकांची बैठक नुकतीच संपन्न झाली. या बैठकीत गणातील शाळांचा शैक्षणिक दर्जा उंचावणे, विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविणे, विविध स्पर्धा परीक्षा व उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग वाढविणे तसेच शाळांना आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
गणातील शिक्षक अतिशय चांगले कार्य करत असून त्यांच्या प्रयत्नांमुळे काही विद्यार्थी स्कॉलरशिप तसेच विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय प्रावीण्य मिळवत आहेत, याबद्दल मेघा इंगावले यांनी शिक्षकांचे कौतुक केले. शाळांचा शैक्षणिक व भौतिक विकास करण्यासाठी आ. शेखर निकम यांच्या मार्गदर्शनाने व सल्ल्याने विशेष प्रयत्न करण्यात येतील, तसेच शाळांच्या सोयी-सुविधांसाठी आवश्यक पाठपुरावा केला जाईल, असे मेघा इंगावले यांनी यावेळी सांगितले. शिक्षकांच्या अडचणी व शाळांच्या गरजा जाणून घेण्यासाठी बैठक आयोजित केल्याबद्दल केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक व शिक्षक वर्गाने मेघा इंगावले यांचे कौतुक केले. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षक, पालक व लोकप्रतिनिधी यांच्या समन्वयातून अधिक प्रभावीपणे काम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. यावेळी मेघा इंगावले, प्रकाश पवार, सचिन बामणे, प्रमोद कदम, सरपंच बैकर, स्कुल कमिटी अध्यक्ष, सतीश कदम, शरद पवार, संतोष सुतार, ग्रामसेविका तसेच शिक्षक वृन्द उपस्थित होते.