आंबडस विद्यालयात रानभाज्या पाककृती स्पर्धा उत्साहात

चिपळूण (प्रतिनिधी) : विद्यार्थ्यांना आपल्या परिसरात सहज उपलब्ध होणाऱ्या विविध रानभाज्यांची ओळख व्हावी, तसेच रानभाज्यांपासून विविध पौष्टिक व चविष्ट पदार्थ बनविता येतात, याची माहिती व्हावी या उद्देशाने आंबडस विद्यालयात मंगळवार, दि. १ सप्टेंबर रोजी रानभाज्या पाककृती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला महिला पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या स्पर्धेसाठी तब्बल १२१ महिला पालकांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ८२ स्पर्धकांनी प्रत्यक्ष स्पर्धेत सहभाग घेत विविध रानभाज्यांपासून नावीन्यपूर्ण आणि आकर्षक पाककृती सादर केल्या. काटल, फोडशी, तेरा, ढेढरा, मायाळू, भारंगी, टाकळा, अळू, आळंबी, सुरण आदी विविध रानभाज्यांचा वापर करून वडे, थालीपीठ, भजी, कटलेट, घावणे यांसह अनेक चविष्ट पदार्थ स्पर्धेत सादर करण्यात आले. पारंपरिक रानभाज्यांचा आधुनिक पद्धतीने उपयोग करून तयार केलेल्या पदार्थांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. पाककृती स्पर्धेत प्रथम क्रमांक – निशा किरण आंब्रे, द्वितीय क्रमांक – दुर्वा दिनेश धाडवे, तर तृतीय क्रमांक श्रावणी श्रीकांत बडबे यांनी पटकावला. उत्तेजनार्थ प्रथम – श्रेया महेंद्र महाडिक आणि उत्तेजनार्थ द्वितीय संचिता सचिन जाधव यांची निवड करण्यात आली.
या कार्यक्रमासाठी सह्याद्री शिक्षण संस्था, सावर्डेच्या उपाध्यक्षा युगंधरा राजेशिर्के, आंबडस विद्यालयाचे चेअरमन अशोक निर्मळ, मुख्याध्यापक वसंत यादव, चिरणीच्या सरपंच सलोनी देवरुखकर तसेच भेलसईच्या सरपंच मयुरी कदम प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी मनोगत व्यक्त करताना युगंधरा राजेशिर्के यांनी रानभाज्यांचे महत्त्व व त्यांचे आरोग्यदायी फायदे याबाबत उपस्थित पालक व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. आपल्या परिसरात वर्षातील सुमारे सहा महिने पुरतील एवढ्या विविध रानभाज्या उपलब्ध होतात, मात्र त्यांची पुरेशी माहिती विद्यार्थ्यांसह पालकांनाही नसल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. कुटुंबाचे आरोग्य हे स्वयंपाकघराशी निगडित असून प्रत्येक गृहिणीने याची जाणीव ठेवणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले. विद्यालयाने आयोजित केलेल्या या उपक्रमाचे कौतुक करत या उपक्रमामुळे पालकांसहित विद्यार्थ्यांनाही विविध रानभाज्यांची माहिती होऊन तिचे महत्त्व समजेल अशी आशा व्यक्त केली व त्यांनी आंबडस विद्यालयाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षासाठी शुभेच्छा दिल्या.
या स्पर्धेचे नियोजन मुख्याध्यापक वसंत यादव यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक गणेश सावर्डेकर व शिक्षिका संगीता चौगुले यांनी केले. स्पर्धेचे परीक्षक म्हणून कृष्णकांत कुंभार, संगीता चौगुले व स्वाती महाडिक यांनी काम पाहिले. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी रुपेश धाडवे, भास्कर महाडिक, संतोष शिंदे तसेच विद्यालयातील विद्यार्थ्यांनी विशेष मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रज्ञा जठार यांनी केले, तर आभार प्रदर्शन संगीता चौगुले यांनी केले. पालकांचा उत्स्फूर्त सहभाग, विद्यार्थ्यांचा उत्साह आणि रानभाज्यांविषयी निर्माण झालेली उत्सुकता यामुळे ही पाककृती स्पर्धा संस्मरणीय ठरली.