वेंगुर्ले येथे ‘नमो उद्याना’चे उद्या लोकार्पण….

खासदार नारायण राणे व पालकमंत्री नितेश राणे यांची उपस्थिती

वेंगुर्ले : दाजी नाईक
वेंगुर्ले नगरपरिषदेच्या वतीने भटवाडी येथे एक कोटी रुपये खर्च करून साकारण्यात आलेल्या ‘नमो उद्याना’चा लोकार्पण सोहळा शुक्रवार, दि. ४ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी ३ वाजता आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री श्री. नितेश राणे यांच्या हस्ते या उद्यानाचे लोकार्पण होणार आहे. या सोहळ्यास माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार नारायण राणे यांची विशेष उपस्थिती राहणार आहे, अशी माहिती नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी दिली.

नमो उद्यानाचा नागरिकांना अधिकाधिक लाभ मिळावा, उद्यानाचा परिसर स्वच्छ, सुंदर व पर्यावरणपूरक राहावा तसेच नागरिकांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी वेंगुर्ला नगरपरिषद प्रशासनाकडून आवश्यक ती कार्यवाही करण्यात आली आहे. वेंगुर्ला शहराच्या सौंदर्यात भर घालणारे तसेच नागरिकांना विरंगुळा, आरोग्य व मनोरंजनासाठी उपयुक्त असे हे नमो उद्यान विकसित करण्यात आले आहे. दरम्यान या लोकार्पण कार्यक्रमाला विधानपरिषद सदस्य ज्ञानेश्वर म्हात्रे, अनिकेत तटकरे, निरंजन डावखरे, आमदार निलेश राणे, आम. दिपक केसरकर, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी आदी प्रमुख मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तसेच भाजप तालुकाध्यक्ष विष्णू उर्फ पप्पू परब, शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर, मुख्याधिकारी हेमंत किरुळकर यांचीही उपस्थिती राहणार आहे.

नगरपरिषदेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या लोकार्पण सोहळ्यास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन नगर परिषदेतर्फे करण्यात आले आहे.