बुलढाणा – श्री. संत गजानन महाराजांची पावन भूमी असलेल्या शेगावची कचोरी संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. शेगावात दर्शनासाठी येणारा प्रत्येक भाविक इथली कचोरी खाल्ल्याशिवाय परत जात नाही. मात्र, याच प्रसिद्ध कचोरीबाबत एक बातमी समोर आली. शेगावच्या प्रसिद्ध कचोरी सेंटर्सपैकी एक असलेल्या तीरथराम करमचंद शर्मा या दुकानात बुलढाणा अन्न आणि औषध प्रशासनाने काल गुरुवारी पोहचून मैदा आणि खाद्य तेलाचे नमुने घेतल्याची माहिती आहे. सदर कारवाई हि दर सहा मैहिन्यात केली जाते असे कचोरी सेंटरच्या मालकाने सांगितले.
अन्न आणि औषध प्रशासनाचे धडक आणि कडक शिस्तीचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशानुसार सध्या संपूर्ण राज्यात भेसळयुक्त खाद्यपदार्थांविरोधात मोठी मोहीम हाती घेण्यात आली आहे. याच मोहिमेचा भाग म्हणून शेगावातील या नामांकित कचोरी सेंटरवर ही कारवाई करण्यात आळायची चर्चा कालपासून रंगत आहे. मात्र दर सहा महिन्यात अन्न व औषधी प्रशासनाकडून तपासणी केल्या जाते, आणि नमुने घेतले जात्तात.त्याच प्रकारे गुरुवारी नमुने घेण्यात आले. शेगावच्या या प्रसिद्ध दुकानात कचोरी कशी बनवली जाते? त्यासाठी कोणत्या दर्जाचा कच्चा माल वापरला जातो? ग्राहकांच्या आरोग्याची काळजी घेतली जाते की नाही? हे तपासण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाचे निरीक्षक गुलाबसिंग वसावे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने हि कारवाई केली.या कारवाईदरम्यान पथकाने कचोरी बनवण्यासाठी वापरण्यात येणारे तेल, मैदा, मसाले आणि इतर कच्च्या मालाचे नमुने गोळा केले आहेत. हे सर्व नमुने आता प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.











