गणेशोत्सवातील अतिरिक्त प्रवासी गर्दी कमी करण्यासाठी कोकण रेल्वेची विशेष सेवा
सावंतवाडीहून सकाळी ६.३० वाजता सुटणार; सोलापूरला दुसऱ्या दिवशी पहाटे १.३० वाजता पोहोचणार
सावंतवाडी : गणेशोत्सवानिमित्त कोकणातून परतीच्या प्रवासासाठी वाढलेली प्रवासी गर्दी लक्षात घेऊन सावंतवाडी रोड ते सोलापूर जंक्शनदरम्यान एकेरी विशेष रेल्वे चालविण्याचा निर्णय कोकण रेल्वेने घेतला आहे. ट्रेन क्रमांक ०१००२ सावंतवाडी रोड–सोलापूर जंक्शन वन वे स्पेशल ही गाडी ४ सप्टेंबर २०२६ रोजी धावणार आहे.
अतिरिक्त प्रवासी गर्दी कमी करण्यासाठी ही विशेष गाडी सोडण्यात येत आहे ४ सप्टेंबर रोजी सकाळी ६.३० वाजता सावंतवाडी रोड स्थानकातून ही गाडी सुटेल. त्यानंतर ती कोकण रेल्वेमार्गे पुढे धावून दुसऱ्या दिवशी म्हणजेच ५ सप्टेंबर रोजी पहाटे १.३० वाजता सोलापूर जंक्शनला पोहोचणार आहे.
या गाडीला कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, वैभववाडी रोड, राजापूर रोड, विलवडे, आडवली, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, चिपळूण, खेड, माणगाव, रोहा, पनवेल, कल्याण जंक्शन, लोणावळा, पुणे जंक्शन, दौंड जंक्शन आणि कुर्डुवाडी या स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत.
विशेष गाडीमध्ये एकूण १६ LHB डबे असतील. त्यात प्रथम श्रेणीचा १ डबा, 2 Tier AC चे २ डबे, 3 Tier AC चे ३ डबे, स्लीपरचे ४ डबे, जनरलचे ४ डबे, एक SLR/D आणि एक जनरेटर कारचा समावेश आहे.
गणेशोत्सवानंतर कोकणातून मुंबई, पुणे आणि सोलापूरकडे परतणाऱ्या प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता ही विशेष सेवा महत्त्वाची ठरणार आहे. प्रवाशांनी या विशेष रेल्वे सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कोकण रेल्वे प्रशासनाने केले आहे.













