अशोक मसूरकर मित्रमंडळाचा सामाजिक बांधिलकी जपणारा उपक्रम
शिरगांव, (प्रतिनिधी) – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा किंजवडे (ठाकूरवाडी) प्रशालेतील अशोक मसूरकर मित्रमंडळातर्फे गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. गुरूपौर्णिमेचे औचित्य साधून ‘एक हात मदतीचा’ या उपक्रमाअंतर्गत हा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. समाजातील दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची साधने उपलब्ध करून देण्याचा हेतू या उपक्रमामागे होता. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद ओसंडून वाहत होता. शाळेतील शिक्षकांनीही या उपक्रमाचे मनःपूर्वक स्वागत केले.
यावेळी किजवडे ग्रामपंचायत सदस्य श्री. किरण टेंबुलकर यांनी उपस्थित राहून गुरूपौर्णिमेचे महत्त्व सांगितले व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. सामाजिक कार्यकर्ते श्री. दिलीप कदम यांनी शिक्षकांचा गुलाबपुष्प देऊन सत्कार केला. यावेळी त्यांनी मंडळाच्या सामाजिक कार्याची स्तुती करताना सांगितले, “गरजूंना शिक्षणाच्या वाटेवर चालण्यासाठी आवश्यक साधने पुरवणं, ही खरी गुरुदक्षिणा आहे.”
या कार्यक्रमप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री. गोविंदराव जाधव यांनी मित्रमंडळाच्या सदस्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. साहित्य मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयी अधिक उत्सुकता निर्माण झाली आहे, असे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमावेळी श्री. गिरीश चव्हाण, श्री. अशोक घाडी, श्री. आत्माराम परब, श्री. दिलीप सुर्वे, श्री. दीपक पाडावे आदी मान्यवर उपस्थित होते.













