खेड (प्रतिनिधी) : महाराष्ट्राला निसर्गाने समृद्ध जैवविविधता आणि विविधांगी सौंदर्याची देणगी दिली आहे. सह्याद्रीच्या हिरव्यागार डोंगररांगा, दऱ्या-खोऱ्या आणि नद्यांच्या परिसरात आढळणाऱ्या विविध वनस्पतींमध्ये महाराष्ट्राचे राज्यफूल ताम्हण याचे विशेष महत्त्व आहे. खेड तालुक्यातील वेरळ-खोपी रस्त्यालगत सवेणी गाव परिसरात ताम्हणाची अनेक फुलझाडे पाहायला मिळतात.
विद्यार्थ्यांना महाराष्ट्राच्या राज्यफुलाची ओळख व्हावी आणि त्याचे महत्त्व समजावे, या उद्देशाने बिजघर क्रमांक १ शाळेत शिक्षक शैलेश पराडकर यांनी विद्यार्थ्यांना ताम्हण या राज्यफुलाविषयी सविस्तर माहिती दिली. इयत्ता पाचवीच्या पाठ्यपुस्तकाच्या मुखपृष्ठ तसेच मलपृष्ठावर ताम्हणाचे चित्र देण्यात आले असून, त्या माध्यमातून विद्यार्थ्यांना या सुंदर वृक्षाची ओळख करून देण्यात आली आहे.
यावेळी बोलताना शैलेश पराडकर यांनी ताम्हण हे केवळ महाराष्ट्राचे राज्यफूल नसून आपल्या देशाच्या नैसर्गिक सौंदर्यात भर घालणारे सुंदर आणि बहुगुणी वृक्ष असल्याचे सांगितले. निसर्गातील अशा मौल्यवान वनस्पतींचे संवर्धन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी असून, विद्यार्थ्यांनीही पर्यावरण संवर्धनाचा संदेश समाजापर्यंत पोहोचवावा, असे आवाहन त्यांनी केले.
या उपक्रमावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका भाग्यश्री काणेकर, संदीप घाणेकर आणि विजय सकपाळ उपस्थित होते. विद्यार्थ्यांना राज्यफुलाची माहिती देण्याबरोबरच स्थानिक जैवविविधतेचे महत्त्व समजावून देणारा हा उपक्रम पर्यावरणप्रेमी दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरला.












