प्रेमजीभाई आसर प्राथमिक विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरे

Google search engine
Google search engine

चिपळूण : परशुराम एज्युकेशन सोसायटी संचालित प्रेमजीभाई आसर प्राथमिक विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन दिनांक २३ व २४ डिसेंबर २०२२ रोजी संस्थेच्या गुरुदक्षिणा सभागृहात मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले.
या स्नेहसंमेलनाचे तसेच हस्तकला, चित्रकला व रांगोळी प्रदर्शनाचे उद्घाटन शाळेचे माजी विद्यार्थी आणि चिपळूण शहरातील कर सल्लागार श्री.गुरुनाथ भिडे यांच्या हस्ते झाले.विद्यार्थ्यांच्या सुमधुर स्वागत गीताने उपस्थित सर्व पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. यानंतर शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती संगिता नाईक यांनी व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. या निमित्ताने स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव या विषयाने सजलेल्या अंकुर हस्तलिखिताचे प्रकाशन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष श्री.विजयकुमार ओसवाल,शालेय समिती अध्यक्षा सौ. वैशाली निमकर उपस्थित होते. आपल्या प्रस्तावनापर मनोगतात शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती संगिता नाईक यांनी स्नेहसंमेलनाचा हेतू स्पष्ट करताना सांगितले,की कला हे शरीर व मनोविकासाचे उत्तम माध्यम आहे यासाठी हस्तकला, रांगोळी प्रदर्शन तसेच नृत्य नाट्य या विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी अनेक उपक्रम वर्षभर राबवत असतो.पाहुण्यांचा परिचय सौ.प्राची गगनग्रास यांनी करून दिला. यावेळी प्रमुख अतिथी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की शाळा ही अभिमानाची जागा आहे माझ्या शालेय जीवनात शिक्षकांनी छडी दिली पण आयुष्याची घडी बसली ती या शाळेमुळेच. त्यांनी विद्यार्थी मित्रांना मार्गदर्शन करताना सांगितले की तुम्ही सर्वांनी स्नेहसंमेलन मध्ये भाग घ्या कारण पुढील आयुष्यात अशी संधी कमी वेळा मिळेल.

विविध वस्तूंचा तसेच टाकाऊ वस्तूंचा उपयोग करून विद्यार्थ्यांनी बनवलेल्या वस्तूंचे हस्तकला प्रदर्शन तसेच छान प्रकारे काढलेल्या रांगोळ्यांचे प्रदर्शन पालकांनी पहावे असेही त्यांनी आवाहन केले. संस्थेचे उपाध्यक्ष श्री.विजयकुमार ओसवाल यांनी उपस्थित पालक ,विद्यार्थी, शिक्षक यांना शुभेच्छा दिल्या व प्रमुख पाहुण्यांचा शाल,श्रीफळ व पुस्तक देऊन सत्कार केला. या कार्यक्रमाला शालेय व्यवस्थापन समिती,विषय तज्ञ श्री.विनायकजी ओक,शाळेच्या माजी मुख्याध्यापिका सौ.विद्या देवधर व सौ.मंजिरी परांजपे तसेच माजी शिक्षिका सौ.सुखदा सोहनी यांची विशेष उपस्थिती लाभली होती.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.ज्योती शिंदे यांनी केले.स्वागत गीत, विद्यार्थी निवेदन याची मांडणी सौ. मीरा बेंदरकर यांनी केली.हस्तकला ,चित्रकला व रांगोळी प्रदर्शन तसेच अंकुर हस्तलिखित याची मांडणी श्री. अशोक मिसाळ,सौ.ज्योती शिंदे,श्री.माधव चौरे व सर्व शिक्षक वृंद यांनी केली. स्नेहसंमेलन विभाग प्रमुख सौ.प्राची गगनग्रास यांनी सर्व कर्मचाऱ्यांच्या सहकार्यातून स्नेहसंमेलनाचे नियोजन केले.