स्व. तानाजी डाफळे प्रतिष्ठानतर्फे कोकणातील १२ दिव्यांगांना व्हीलचेअरचे वाटप

गुहागर | प्रतिनिधी:
तालुक्यातील चिंद्रावळे गावचे सुपुत्र आणि रुग्णसेवक श्री. मनोज डाफळे यांच्या पुढाकाराने स्व. तानाजी डाफळे प्रतिष्ठानच्या माध्यमातून कोकणातील गरजू दिव्यांग व अपंग व्यक्तींना व्हीलचेअर वाटप करण्याच्या उपक्रमाचा शुभारंभ नुकताच उत्साहात करण्यात आला.

श्री. मनोज डाफळे हे कोरोना काळापासून वैद्यकीय क्षेत्रात रुग्णसेवेचे कार्य करत असून, गुहागर तालुक्यासह विविध जिल्ह्यांतील गरजू रुग्णांना वैद्यकीय मदत व सहकार्य करण्याचे काम सातत्याने करत आहेत. वैद्यकीय सेवेसोबतच क्रीडा व शैक्षणिक क्षेत्रातही त्यांचे योगदान आहे.

विरार-नालासोपारा परिसरातील कोकणवासीयांना मदत करताना रुग्णांसाठी रुग्णवाहिकेची गरज लक्षात घेऊन त्यांनी या सुविधेसाठी पुढाकार घेतला. गुहागर तालुक्याचे सुपुत्र तथा वरळीचे माजी शिवसेना नगरसेवक दत्ता नरवणकर यांच्या माध्यमातून रुग्णवाहिकेची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. कोकणातील गरीब व गरजू रुग्णांसाठी विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

या उपक्रमांतर्गत कोकणातील एकूण १२ दिव्यांग व्यक्तींना व्हीलचेअरचे वाटप करण्यात येणार असून, त्याचा शुभारंभ ३० ऑगस्ट रोजी करण्यात आला. या निमित्ताने आयोजित करण्यात आलेला कलगी-तुरा सामना व मनोरंजनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.

व्हीलचेअर वाटप शुभारंभ कार्यक्रमाला व्हीलचेअरचे सौजन्य देणारे गुहागर तालुक्याचे सुपुत्र व समाजसेवक श्री. प्रशांत दादा केळसकर यांचे बंधू प्रकाश दादा, विरार शिवसेना शहरप्रमुख श्री. उदय दादा जाधव, गुहागर तालुक्याचे सुपुत्र व माजी पोलीस उपनिरीक्षक श्री. मनोहर गुरव, स्वामी छाया ट्रॅव्हल्सचे मालक श्री. अक्षय जाधव, समाजसेवक श्री. मिलेश जाधव, मनसे पदाधिकारी श्री. अशोक कांबळे, समाजसेवक श्री. मंगेश किजबिले, पत्रकार श्री. अमोल पवार, भजन मंडळाचे पदाधिकारी श्री. जोगळे, नर्स नमिता गोणबरे, शाहीर सुधाकर गोणबरे, शाहीर अमित पेजले, विजय घाणेकर, आनंद नाचरे, विनायक वाघे, विलास गुरव तसेच श्रीमती निर्मला तानाजी डाफळे यांच्यासह विविध मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते.

गरजू दिव्यांग व्यक्तींना आधार देणाऱ्या या सामाजिक उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले. स्व. तानाजी डाफळे प्रतिष्ठानच्या माध्यमातून भविष्यातही कोकणातील गरजू रुग्ण व दिव्यांग व्यक्तींसाठी विविध सामाजिक उपक्रम राबविण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.