सावंतवाडी । प्रतिनिधी : ४० व्या महाराष्ट्र राज्य ज्युनियर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२६ या प्रतिष्ठेच्या राज्यस्तरीय स्पर्धेत मालवणच्या कु. महिमा विशाल मोहिते हिने उत्कृष्ट क्रीडा कौशल्य दाखवत कांस्यपदकाची कमाई केली आहे. तिने १४ वर्षांखालील मुलींच्या ट्रायथलॉन (Under-14 Girls – Triathlon B) या क्रीडा प्रकारात तृतीय क्रमांक पटकावून हे यश संपादन केले.
या स्पर्धेत महिमाने लॉंग जंप, ६० मीटर धावणे आणि बॅक थ्रो या तीनही क्रीडा प्रकारांमध्ये उल्लेखनीय कामगिरी नोंदवली. राज्यस्तरावर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करत तिने मिळविलेले हे यश जिल्ह्यातील क्रीडाप्रेमींसाठी अत्यंत अभिमानाची बाब ठरली आहे. महिमाच्या या यशामागे तिची चिकाटी, सातत्यपूर्ण सराव आणि मेहनत कारणीभूत असून, तिला एनआयएस (NIS) कोच अनिकेत पाटील सर व सुजल गवस सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.
तिच्या या उल्लेखनीय आणि दैदीप्यमान कामगिरीबद्दल अश्वमेध स्पोर्ट्स अकॅडमी, सिंधुदुर्ग यांच्या वतीने कु. महिमा मोहिते हिचे विशेष कौतुक व हार्दिक अभिनंदन करण्यात आले. या यशाबद्दल तिच्यावर सध्या क्रीडा क्षेत्रातून व विविध स्तरांतून कौतुकाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.













