कुवारबावमध्ये उद्या रंगणार MTM BOY’S चा ‘जल्लोष दहीहंडी २०२६’; १५,५५५ रुपयांचे महाबक्षीस आणि मानाचा चषक

रत्नागिरी : येथील MTM BOY’S च्या वतीने उद्या, शनिवार दि. ५ सप्टेंबर २०२६ रोजी ‘जल्लोष दहीहंडीचा उत्सव २०२६’ चे भव्य-दिव्य आयोजन करण्यात आले आहे. कुवारबाव येथील महालक्ष्मी मंडळ मैदान, उत्कर्षनगर येथे हा थरारक सोहळा रंगणार असून बाळ गोपाळांच्या जयघोषात आणि ढोल-ताशांच्या गजरात परिसर दुमदुमून निघणार आहे.

यंदाच्या महासंग्रामात हंडी फोडणाऱ्या विजेत्या गोविंदा पथकाला १५,५५५ रुपये रोख रक्कम आणि मानाचा भव्य आकर्षक चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. या स्पर्धेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे केवळ हंडी फोडणाऱ्या पथकालाच नव्हे, तर उत्सवात उपस्थित राहून सलामी देणाऱ्या प्रत्येक गोविंदा पथकाला आकर्षक सन्मानचिन्ह आणि विशेष रोख बक्षीस देऊन सन्मानित केले जाणार आहे.

‘थर लावला तरी सन्मान आणि हंडी फोडली तरी बक्षीस’ अशा या अनोख्या उपक्रमामुळे स्थानिक व परिसरातील गोविंदा पथकांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे. या दहीहंडी उत्सवात परिसरातील नागरिकांनी व गोविंदा पथकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजक MTM BOY’S, कुवारबाव यांच्या वतीने करण्यात आले आहे.