गवा रेड्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढल्याने वाहनधारकांमध्ये भीतीचे वातावरण
वनविभागाने गव्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी
निलेश जाधव / देवरूख
देवरूखहून रत्नागिरीच्या दिशेने जात असलेल्या दुचाकीस्वाराच्या दुचाकीला गवारेड्याची धडक बसून दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना देवरूख-रत्नागिरी मार्गावरील आंबव येथे आज शुक्रवारी सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास घडली आहे. स्वप्नील जयराम पेडामकर (वय-३७ रा. सह्याद्रीनगर, साडवली. ता. संगमेश्वर) असे गंभीर जखमी झालेल्या तरूणाचे नाव आहे. त्याच्यावर सध्या रत्नागिरीतील एका खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
याबाबत देवरूख वनविभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, स्वप्नील पेडामकर हा कामानिमित्त आपल्या ताब्यातील मोटारसायकलवरून देवरूखहून रत्नागिरीकडे जात होता. त्याची मोटारसायकल आंबव येथे आली असता रस्त्याच्या कडेला असलेल्या जंगलातून गवारेडा धावत रस्त्यावर आला व या गव्याची मोटारसायकलला धडक बसली. गव्याच्या जोरदार धडकेत दुचाकी रस्त्याच्या कडेला फेकली गेली. अपघाताचा आवाज ऐकून स्थानिकांनी तातडीने धाव घेतली असता स्वप्नील हा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळला. त्याच्या डोक्याला आणि हाता-पायाला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्याला तात्काळ उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.
यानंतर अधिक उपचारासाठी त्याला रत्नागिरी येथे एका खाजगी रूग्णलयात हलवण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच रत्नागिरीचे परिक्षेत्र वनाधिकारी विक्रम गुरव व देवरूख वनविभागाचे वनपाल सागर गोसावी यांनी सहकाऱ्यांसह तात्काळ घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला आहे. तसेच त्यांनी रत्नागिरी येथे जावून गंभीर जखमी झालेल्या स्वप्नीलची विचारपूस केली आहे. दरम्यान, स्वप्नीलच्या नातेवाईकांनी नुकसान भरपाई मिळावी यासाठी वनविभागाकडे अर्ज दाखल केल्याचे वनपाल सागर गोसावी यांनी सांगितले आहे. देवरूख- रत्नागिरी मार्गावर गेल्या काही दिवसांपासून गवा रेड्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढल्याने वाहनधारकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वनविभागाने तातडीने गव्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.












