” शिक्षक दिन विशेष ” जीवनाला योग्य दिशा दाखवणारे खरे मार्गदर्शक! सौ. प्राजक्ता झुंजार पेडणेकर ( मसुरे ) “गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः ।

गुरुः साक्षात् परंब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः ॥”

मानवी जीवनाला योग्य दिशा देण्याचे आणि विचारांना परिपक्व करण्याचे काम शिक्षक करतात. वर्षातील प्रत्येक दिवस हा शिक्षकांचे आभार मानण्यासाठी कमीच आहे, परंतु ५ सप्टेंबर हा दिवस संपूर्ण भारतात ‘शिक्षक दिन’ म्हणून विशेष उत्साहाने साजरा केला जातो. भारताचे दुसरे राष्ट्रपती, थोर तत्त्वज्ञ आणि महान शिक्षणतज्ज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस शिक्षकांच्या सन्मानासाठी समर्पित करण्यात आला आहे.

शिक्षक हा केवळ पुस्तकी ज्ञान देणारा घटक नसून तो संस्कारांचा आणि विचारांचा पाया रचणारा शिल्पकार असतो. लहान वयात शाळेत पाऊल ठेवणाऱ्या मुलाचे कच्चे मडके घडवून त्याला सुजाण नागरिक बनवण्याचे काम शिक्षक करतात.

आजच्या आधुनिक काळात शिक्षक केवळ फळ्यावर लिहिणारे गुरुजी राहिलेले नाहीत, तर ते विद्यार्थ्यांचे मित्र, तत्त्वज्ञ आणि वाटाडे बनले आहेत. ज्ञानासोबतच सत्य, अहिंसा, शिस्त, सहकार्य आणि नैतिक मूल्ये विद्यार्थ्यांच्या मनात रुजवण्याचे काम शिक्षक करतात. प्रत्येक विद्यार्थ्याची क्षमता वेगळी असते. त्याच्यातील सुप्त गुणांना ओळखून त्याला प्रोत्साहन देणे आणि त्याच्या मनात स्वतःबद्दल विश्वास निर्माण करणे ही शिक्षकाची मोठी ताकद असते.

आजचे युग हे तंत्रज्ञानाचे आणि माहितीचे युग आहे. गुगल किंवा एआय (AI) एका क्लिकवर अब्जावधी माहिती देऊ शकते, पण माहितीचा योग्य वापर कसा करावा, योग्य काय आणि अयोग्य काय यातील फरक शिकवण्याचे काम फक्त शिक्षकच करू शकतात. डिजिटल वर्गातही सहानुभूती आणि आपुलकी देण्याचे कार्य शिक्षकच करतात.

डिजिटल युग आणि नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाने पारंपरिक शिक्षण पद्धतीचे रूप पूर्णपणे बदलून टाकले आहे.त्यामुळे आधुनिक शिक्षण व्यवस्थेत शिक्षकाची भूमिका केवळ ‘शिकवणे’ एवढी मर्यादित न राहता एका ‘मार्गदर्शकाची’ झाली आहे. ई-लर्निंग, डिजिटल क्लासरूम, शैक्षणिक ॲप्स आणि एआय (AI) टूल्सचा वापर करून शिक्षण अधिक रंजक बनवणे ही प्रमुख जबाबदारी झाली आहे.वाढता ताणतणाव आणि स्पर्धा लक्षात घेता शिक्षक केवळ शिक्षक न राहता एक समुपदेशक म्हणून विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याची काळजी घेत आहेत. इंटरनेटच्या युगात विद्यार्थ्यांना योग्य आणि अयोग्य यातील फरक समजणे आणि त्यांच्यात नैतिक मूल्यांची पेरणी करणे ही जबाबदारी सुद्धा शिक्षक पार पाडत आहेत.बदलत्या अभ्यासक्रमानुसार आणि नवीन शैक्षणिक तंत्रज्ञानानुसार शिक्षकांनी स्वतःचे ज्ञान सातत्याने अद्ययावत ठेवणे अनिवार्य झाले आहे. तंत्रज्ञानाची साथ आणि मानवी मूल्यांची जोड देऊन विद्यार्थ्यांना भविष्यातील आव्हानांसाठी सक्षम करणे हीच बदलत्या शिक्षण पद्धतीतील शिक्षकाची सर्वात मोठी जबाबदारी आहे.

आई-वडील जन्माला घालतात, पण जगण्याचा खरा अर्थ शिक्षक शिकवतात. शिक्षकांनी दिलेल्या ज्ञानाच्या शिदोरीवरच माणूस आयुष्यातील मोठ्या आव्हानांवर मात करू शकतो. त्यामुळे शिक्षकांबद्दल केवळ एका दिवसापुरती कृतज्ञता न ठेवता, त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चालणे आणि त्यांचा नेहमी आदर राखणे हीच त्यांच्यासाठी खरी गुरुदक्षिणा ठरेल…..!

सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!