आरोंद्यात काथ्या उद्योग कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद..

महिलांनी प्रशिक्षण घेऊन स्वावलंबी व्हावे – ज्येष्ठ नेते एम. के. गावडे

वेंगुर्ले : प्रतिनिधी

ग्रामीण भागातील महिलांना काथ्या उद्योगाचे प्रशिक्षण देऊन त्यांना स्वयंरोजगाराच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने आरोंदा येथे काथ्या उद्योग कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. महिला काथ्या कारखान्याचे मार्गदर्शक तथा सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ नेते एम. के. गावडे यांच्या हस्ते या कार्यशाळेचे उद्घाटन झाले.

कॉयर बोर्ड आयोजित या कार्यशाळेला आरोंदा सरपंच सायली साळगावकर, देवस्थान प्रमुख बबन नाईक, कॉयर बोर्ड ऑफिसर इन्चार्ज श्रीनिवास बिटर्लिंगू, महिला काथ्या कारखान्याच्या व्यवस्थापकीय संचालक श्रीमती प्रज्ञा परब, मा.वि.म. च्या सुशांती आरोंदेकर, उमेदच्या अश्विनी जाधव आदी उपस्थित होते.

कार्यशाळेत कॉयर बोर्डच्या विविध योजना, काथ्या उद्योगासाठी आवश्यक प्रशिक्षण, उद्योग उभारणीची प्रक्रिया तसेच उत्पादनाच्या विक्रीबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. आरोंदा गावातील महिलांनी मोठ्या संख्येने या उद्योगाकडे वळावे, यासाठी आवश्यक ते सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही यावेळी देण्यात आली. भविष्यात आरोंदा येथे मोठ्या प्रमाणात उद्योग मेळावा आयोजित करण्याचा मानसही व्यक्त करण्यात आला.

यावेळी मार्गदर्शन करताना एम. के. गावडे यांनी आरोंदा व आरोंदा पंचक्रोशी काथ्या उद्योगासाठी अत्यंत योग्य असल्याचे सांगितले. महिलांनी मोठ्या प्रमाणात प्रशिक्षण घेऊन स्वतःचा उद्योग सुरू करावा. उद्योग सुरू केल्यानंतर उत्पादनाच्या विक्रीसाठीही आवश्यक ते मार्गदर्शन व सहकार्य करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. महिलांनी उद्योगासोबतच स्वतःच्या आरोग्याकडेही लक्ष द्यावे आणि आर्थिक स्वावलंबनासाठी पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले.

सरपंच सायली साळगावकर यांनी गावातील महिलांना उद्योगासाठी आवश्यक सहकार्य करण्याची भूमिका स्पष्ट केली. काथ्या उद्योगाच्या माध्यमातून महिलांना स्थानिक पातळीवर रोजगाराची संधी उपलब्ध होऊन त्यांच्या कुटुंबाच्या आर्थिक उत्पन्नात भर पडू शकते, त्यामुळे महिलांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.

कार्यशाळेस नंदकिशोर नाईक, सौ. रेणुका नाईक, कृषिकन्या कु. पल्लवी दाभोळकर, कु. तन्वी भगत तसेच कोल्हापूर बचत गटाच्या महिला सदस्यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. राधिका पावसकर यांनी केले. कार्यशाळेमुळे आरोंदा परिसरातील महिलांना काथ्या उद्योगाबाबत प्रत्यक्ष मार्गदर्शन मिळाल्याने महिला वर्गातून समाधान व्यक्त करण्यात आले.