देवरूख (प्रतिनिधी):
उत्सवाच्या आनंदापेक्षा मानवी जीवनाचे मूल्य अधिक असते, याचाच प्रत्यय देवरूखजवळील साडवली येथील ‘सह्याद्रीनगर मित्र मंडळाने’ घडवून आणला आहे. दरवर्षी अत्यंत उत्साहात साजरी केली जाणारी दहीहंडी यंदा रद्द करून, त्यातून जमा झालेला संपूर्ण निधी गवारेडाच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या स्थानिक तरुण स्वप्नील पेडामकर याच्या उपचारासाठी देण्याचा एक अत्यंत स्तुत्य निर्णय मंडळाने घेतला आहे.
देवरूखहून रत्नागिरीकडे दुचाकीने जात असलेल्या साडवली सह्याद्रीनगर येथील स्वप्नील पेडामकर याच्या दुचाकीला आंबव येथे गवारेड्याने जोरदार धडक दिली होती. यावेळी स्वप्नील हा रस्त्यावर फेकला जावून गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर सध्या रत्नागिरी येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने उपचारासाठी मोठ्या प्रमाणावर आर्थिक मदतीची गरज आहे. तरुणावर कोसळलेल्या या संकटाच्या काळात सह्याद्रीनगर मित्र मंडळ त्याच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले आहे.
मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी तातडीने बैठक घेऊन यंदाची दहीहंडी न साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे. उत्सव, डीजे आणि इतर खर्चाला फाटा देत, दहीहंडीसाठी जमा झालेला संपूर्ण निधी स्वप्नीलच्या उपचारासाठी सुपूर्द करण्याचा निर्णय एकमुखाने घेण्यात आला. केवळ जल्लोष आणि मनोरंजन म्हणजेच उत्सव नव्हे, तर अडचणीच्या वेळी आपल्याच भावाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे हीच खरी संस्कृती आहे, हेच सह्याद्रीनगर मित्र मंडळाने दाखवून दिले आहे. या सामाजिक बांधिलकीचे आणि संवेदनशीलतेचे संपूर्ण देवरुख व साडवली परिसरातून जोरदार कौतुक होत असून, स्वप्नील लवकरात लवकर बरा व्हावा अशी प्रार्थना सर्वजण करत आहेत.













