कुडाळमध्ये ‘गोविंदा रे गोपाळा’चा जल्लोष; दहीहंडी सोहळा दिमाखात

हेल्प ग्रुपच्या दहीहंडीला गांगोमाऊली गोविंदा पथकाची सात थरांची सलामी

स्वप्निल कदम- कुडाळ :
‘गोविंदा रे गोपाळा, बोल बजरंगबली की जय’च्या जयघोषात, डीजेच्या तालावर आणि विविधांगी नृत्याविष्कारांनी कुडाळ शहरासह तालुक्यात दहीहंडीचा सोहळा मोठ्या उत्साहात व दिमाखात साजरा करण्यात आला. गोविंदा पथकांनी रचलेले थरावर थर हे या सोहळ्याचे विशेष आकर्षण ठरले.

कुडाळ येथील लक्ष्मी नक्षत्र टॉवरसमोर हेल्प ग्रुप कुडाळच्या वतीने २२ व्या वर्षी दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. दोनशेहून अधिक सदस्य असलेल्या हेल्प ग्रुपच्या या दहीहंडी सोहळ्याला कुडाळ शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

दहीहंडी सोहळ्याचा शुभारंभ गांगोमाऊली गोविंदा पथक, फोंडाघाट यांनी केला. या पथकाने पहिल्याच प्रयत्नात तब्बल सात थर रचून दहीहंडीला दिमाखदार सलामी दिली. त्यानंतर कविता राऊळ-शेट्ये संचालित सिद्धाई डान्स अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी गणेशनृत्य सादर करून कार्यक्रमाची रंगत वाढवली. चिमणी पाखर डान्स अकॅडमीच्या कलाकारांनीही आकर्षक नृत्याविष्कार सादर करून उपस्थितांची मने जिंकली.

सिंधुदुर्गवासीयांची मने जिंकलेल्या हेल्प ग्रुपने यंदाही सर्वांसाठी डीजे व ढोलपथकांसह दहीहंडीचा थरार आणि विविध मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

यावेळी आमदार प्रमोद जठार, बबलू सावंत, बंड्या सावंत, संजय कोरगावकर, मनोज वालावलकर, संग्राम सावंत, जीवन बांदेकर, बंटी तुळसकर, धीरज पांचाळ, मनोज सावंत, जय नेरुरकर, विलास भोसले, दीपक रांजणकर, जयदीप तुळसकर, प्रकाश गोरख, धनंजय पाताडे, गणेश गोखरे, रोशन सावंत, नागेश नार्वेकर, गुरुदास यादव, प्रकाश गोंधळी, रत्नाकर जोशी, गौरव जाधव, अभी परब, सचिन कोंडसकर, बादल चौधरी, गुरु देसाई, रविंद्र शेट्ये यांच्यासह हेल्प ग्रुपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे निवेदन बादल चौधरी यांनी केले.