“राजकारण सकारात्मक असावे; कोकणावरचा अन्याय यापुढे सहन केला जाणार नाही”

आमदार निलेश राणे यांचे प्रतिपादन; घावनाळेतील उबाठाच्या सुमारे २५० कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

दिनेश वारंग यांच्या नेतृत्वाचे आमदार निलेश राणे यांनी केले कौतुक

स्वप्निल कदम -कुडाळ :
“राजकारण हे सकारात्मक असले पाहिजे. कोणावरही टीका करण्यापेक्षा जनतेची कामे आणि मतदारसंघाचा विकास याला प्राधान्य दिले पाहिजे. २०१४ पूर्वीही या मतदारसंघात काम केले आहे. मात्र, मागील दहा वर्षांत योग्य नियोजनाअभावी मतदारसंघ विकासाच्या बाबतीत मागे गेला. २१व्या शतकातही वाडी-वस्तीतील रस्त्यांसाठी मागणी करावी लागते, ही खंत आहे. कोकणाने कोणाचे काय वाईट केले की आमच्यावर एवढा अन्याय होतो? मात्र, यापुढे असे होणार नाही. जनतेची प्रत्येक समस्या मार्गी लावण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न केले जातील,” असा विश्वास आमदार निलेश राणे यांनी व्यक्त केला.

कुडाळ तालुक्यातील घावनाळे येथे उबाठाच्या सुमारे २५० कार्यकर्त्यांनी आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे घावनाळे गावात शिवसेनेची संघटनात्मक ताकद अधिक मजबूत झाली असून, ‘शतप्रतिशत शिवसेना’ उभी राहिल्याचे उपतालुकाप्रमुख दिनेश वारंग यांनी जाहीर केले.

आमदार निलेश राणे म्हणाले, “लोकांना विकास निधी सहज उपलब्ध होतो असे वाटते; मात्र २८८ मतदारसंघांमधून आपल्या मतदारसंघासाठी विकास निधी आणण्यासाठी मोठे प्रयत्न आणि मेहनत घ्यावी लागते. प्रवेश करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याचा विश्वास वाया जाऊ दिला जाणार नाही. घावनाळे गावातील विकासकामे आणि जनतेच्या समस्या प्राधान्याने मार्गी लावल्या जातील. दिनेश वारंग हा धडपडणारा कार्यकर्ता असून जनतेच्या अडीअडचणींमध्ये नेहमी उभा राहतो. त्याच्या सर्व मागण्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जातील. आपण सर्वांनी त्याच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे,” असे आवाहन त्यांनी केले.

“घावनाळे गाव मी दत्तक घेत आहे”

जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांची घोषणा

जिल्हाप्रमुख दत्ता सामंत म्हणाले, “लोकसभा निवडणुकीपूर्वी घावनाळे गावात शिवसेनेची ताकद कमी होती. मात्र, दिनेश वारंग यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर गावातील वाडी-वस्त्यांमध्ये शिवसेना पोहोचली आहे. दिनेश वारंग हे धडपडणारे नेतृत्व असून गावातील प्रत्येक वाडी-वस्तीत त्यांच्याबद्दल समाधान व्यक्त केले जाते. हीच ताकद कायम ठेवा. गावच्या विकासाची जबाबदारी आमची आहे. यापुढे घावनाळे गाव मी दत्तक घेत असून गावचा विकास मागे राहणार नाही. आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून गावातील सर्व समस्या सोडविल्या जातील,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

“राणे कुटुंबाने दिलेला प्रत्येक शब्द पूर्ण केला”

उपतालुकाप्रमुख दिनेश वारंग यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, “मी शिवसेनेमध्ये राणे कुटुंबाशी जोडला गेलो. त्यावेळी मला जी आश्वासने देण्यात आली, ती आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून पूर्ण करण्यात आली आहेत. गावातील वाडी-वस्तीतील रस्त्यांची कामे पावसाळ्यापूर्वी तसेच गणेशोत्सवापूर्वी पूर्ण झाल्याने ग्रामस्थांच्या समस्या दूर झाल्या आहेत. उर्वरित कामेदेखील आमदार निलेश राणे व जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या माध्यमातून पूर्ण होतील,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी प्रवेशकर्ते दिनकर तोरस्कर व जयेश तेंडुलकर यांनी मनोगत व्यक्त करून विकासकामांबाबत समाधान व्यक्त केले. कुडाळ सभापती मिलिंद नाईक, जिल्हा परिषद सदस्य दीपक नारकर यांनीही विचार मांडले.

युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या

पक्षप्रवेशानंतर आमदार निलेश राणे यांच्या हस्ते घावनाळे गावातील युवा सेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. प्रथमेश वारंग यांची युवा सेना शाखाप्रमुखपदी, बबलू तावडे यांची बूथप्रमुखपदी, तर अमोल पालव यांची उपविभागप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली. नवनियुक्त तंटामुक्ती समिती अध्यक्ष जयराम सुद्रिक यांचेही आमदार राणे यांनी अभिनंदन केले.

दरम्यान, कोचरेवाडी ग्रामस्थांचा रस्त्याचा प्रश्न मार्गी लागल्याने ग्रामस्थांनी आमदार निलेश राणे व जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचा सत्कार करून आभार मानले.

यावेळी उपजिल्हाप्रमुख आनंद शिरवलकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजय पडते, काका कुडाळकर, दिनेश साळगावकर, रुपेश कानडे, संतोष साठविलकर, नागेश अहिर, विनायक राणे, अरविंद करलकर, देवेंद्र नाईक, किसन मांजरेकर, सरपंच आरती वारंग, उपसरपंच योगेश घाडीगावकर, प्रभाकर वारंग, आनंद परब, हेमंत पालव, राजा घावनाळकर, ओंकार सावंत, संदीप पारकर, निलेश धुरी, लक्ष्मण आदी उपस्थित होते. कार्यक्रमास घावनाळे गावातील ग्रामस्थांची मोठी उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्ता कोरगावकर यांनी केले.