‘प्रदेशाध्यक्ष चषक २०२६’चे आयोजन ; विजेत्या संघाचा २१ हजार रुपये व चषक देऊन होणार गौरव…
वेंगुर्ला : दाजी नाईक
भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष श्री. रविंद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त आर सी ग्रुप तुळस यांच्या वतीने सलग दुसऱ्या वर्षी ‘प्रदेशाध्यक्ष चषक २०२६’ या राज्यस्तरीय भव्य निमंत्रित संगीत भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार, दि. २ ऑक्टोबर आणि शनिवार, दि. ३ ऑक्टोबर २०२६ रोजी तुळस येथे ही स्पर्धा रंगणार आहे.
गेल्या वर्षीच्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर यंदाही भजनप्रेमींसाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांतील निमंत्रित भजन मंडळांना सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.
स्पर्धेतील प्रथम क्रमांकाच्या विजेत्या भजन मंडळाला २१ हजार रुपये व चषक, द्वितीय क्रमांकाला १५ हजार रुपये व चषक, तर तृतीय क्रमांकाला ११ हजार रुपये व चषक प्रदान करण्यात येणार आहे. उत्तेजनार्थ प्रथम क्रमांकासाठी ७ हजार, द्वितीय क्रमांकासाठी ५ हजार आणि तृतीय क्रमांकासाठी ३ हजार रुपये व चषक अशी पारितोषिके ठेवण्यात आली आहेत.
स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कलाकारांनाही वैयक्तिक पुरस्कार देण्यात येणार आहेत. उत्कृष्ट गायक, पखवाजवादक, तबलावादक, कोरस, झांजवादक, शिस्तबद्ध संघ, हार्मोनियमवादक आणि उत्कृष्ट गजर यांना प्रत्येकी १ हजार रुपये व चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच अचूक तीन क्रमांक सांगणाऱ्या भाग्यवान प्रेक्षकांनाही प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकानुसार आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहेत.
पारंपरिक भजन संस्कृतीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने स्पर्धेचे सादरीकरण निश्चित केलेल्या थाटानुसार होणार आहे. यामध्ये प्रार्थना, जयकार/नोटेशन गीत, रुपावली, संत तुकाराम महाराजांच्या गाथेतील अभंग, छत्रपती शिवाजी महाराजांचा गजर, संत नामदेव महाराज किंवा संत एकनाथ महाराज रचित गौळण आणि अंतिम गजर यांचा समावेश आहे.
प्रत्येक भजन मंडळामध्ये किमान ८ आणि कमाल १२ सदस्य असणे आवश्यक असून प्रत्येक संघाला सादरीकरणासाठी ४५ मिनिटांचा कालावधी देण्यात येणार आहे. अंतिम गजरामध्ये पखवाज व तबला जुगलबंदीसाठी ३ ते ५ मिनिटांचा कालावधी राखीव ठेवण्यात आला आहे. इलेक्ट्रॉनिक तानपुरा वगळता इतर इलेक्ट्रॉनिक वाद्यांना परवानगी देण्यात आलेली नाही. या स्पर्धेत नवीन बारा संघ सहभागी होणार आहेत.
स्पर्धेचे YouTube Live प्रक्षेपण करण्यात येणार असून परीक्षक म्हणून श्री. दिप्तेश मेस्त्री आणि श्री. मनिष तांबोसकर काम पाहणार आहेत.
सलग दुसऱ्या वर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या या राज्यस्तरीय भव्य भजन स्पर्धेला भजनप्रेमी रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून पारंपरिक संगीत व भजन संस्कृतीचा आनंद घ्यावा, असे आवाहन RC ग्रुप तुळस यांच्या वतीने करण्यात आले आहे.
स्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी बुवा पुरुषोत्तम परब – ९४०५१८४३८१, रत्नाकर शिरोडकर – ९३५६२६७८५३, नितीन कोचरेकर – ९४२११४४२५२ आणि रोहन सावंत – ९४०३३५३२०० यांच्याशी संपर्क साधावा.
तसेच स्पर्धा नियोजन व माहितीसाठी पिंट्या राऊळ – ९४२१२६८०४५, प्रमोद गोळम – ८६९३०३३४२३ आणि सिद्धेश शेटकर – ९२८४६४२०९१ यांच्याशी संपर्क साधावा.










