‘साहेबांच्या सहवासातून आम्ही घडलो’; स्वप्ना यादव यांचे भावोद्गार

चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांच्या वाढदिनी व्यक्त केल्या आपल्या भावना

चिपळूण (प्रतिनिधी) : चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पद भूषविणाऱ्या सौ. स्वप्ना यादव यांनी प्रास्ताविकातून संस्थेचे अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांच्या कार्याचा गौरव करताना त्यांच्या सहकारातील प्रदीर्घ योगदानाच्या आठवणींना उजाळा दिला. “साहेबांच्या सहवासात राहून आम्हाला काम करण्याची, समाजाशी जोडून घेण्याची आणि जबाबदारीने पुढे जाण्याची शिकवण मिळाली. त्यांच्या तालमीत घडलेले आम्ही सर्वजण संस्थेची वाटचाल सक्षमपणे पुढे नेण्यासाठी कटिबद्ध आहोत,” असे त्यांनी सांगितले.
चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांचा अभिष्टचिंतन सोहळा पतसंस्थेच्या सहकार भवन सभागृहात आयोजित करण्यात आला होता. यावेळी त्या बोलत होत्या. चिपळूण नागरीच्या वतीने दरवर्षी आयोजित करण्यात येणारा हा सोहळा कर्मचारी, संचालक, सभासद आणि हितचिंतकांसाठी आनंदाचा आणि प्रेरणादायी क्षण असल्याचे सौ. स्वप्ना यादव यांनी सांगितले. गेल्या १८ वर्षांपासून हा कार्यक्रम सातत्याने आयोजित केला जात असून, या निमित्ताने सहकार कार्यशाळा, सामाजिक बांधिलकीचे उपक्रम तसेच विविध विधायक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यंदाही सहकार कार्यशाळेच्या माध्यमातून सभासदांना मार्गदर्शन व प्रशिक्षण देण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
सुभाषराव चव्हाण यांनी सहकार क्षेत्रात दिलेल्या ५० वर्षांच्या योगदानाचा उल्लेख करताना सौ. यादव म्हणाल्या की, “सहकारात पाच दशके सातत्याने काम करणे ही छोटी गोष्ट नाही. कोणतीही अपेक्षा न ठेवता, कामाने झपाटून जाऊन समाजासाठी कार्य करणे हेच साहेबांचे वैशिष्ट्य आहे. त्यांच्या व्यक्तिमत्त्वातून आम्हाला सातत्य, प्रामाणिकपणा आणि सामाजिक बांधिलकीची प्रेरणा मिळते.” सहकार क्षेत्रात सातत्याने बदल होत आहेत. त्यामुळे कायद्यातील बदल, त्यांची अंमलबजावणी, संस्थेच्या कामकाजातील नवे बदल तसेच महिलांना सहकार क्षेत्रात अधिक संधी देण्याबाबत सभासदांना प्रशिक्षण मिळणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कोकणातील शेती, शेतीपूरक व्यवसाय, प्रक्रिया उद्योग तसेच बचत गटांच्या माध्यमातून महिलांना एकत्र आणून रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. “शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी सहकाराच्या माध्यमातून करता येऊ शकते. यासाठी सभासद, विशेषतः महिलांना योग्य प्रशिक्षण आणि मार्गदर्शन मिळणे आवश्यक आहे,” असे यादव यांनी नमूद केले.
चिपळूण नागरीचे ‘आपली माणसं, आपली संस्था’ हे ब्रीद संस्थेच्या प्रत्यक्ष कामातून सार्थ ठरत असल्याचे सांगताना त्यांनी संस्थेच्या सभासदसंख्येचाही उल्लेख केला. सुमारे १ लाख ५१ हजार ६७ सभासदांशी संस्थेचे जिव्हाळ्याचे नाते निर्माण झाले असून, सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून संस्था कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले. “कुटुंबात वेगवेगळे विचार असतात; मात्र त्या सर्व विचारांना सोबत घेऊन त्यांना योग्य दिशा देण्याची कला साहेबांनी आम्हाला शिकवली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वजण जबाबदारीने काम करत आहोत. संस्थेचे हे ‘शिवधनुष्य’ सक्षमपणे पुढे नेण्याची जबाबदारी आम्ही प्रामाणिकपणे पार पाडू,” असा विश्वासही सौ. स्वप्ना यादव यांनी यावेळी व्यक्त केला.
सुभाषराव चव्हाण यांच्या आशीर्वादामुळेच माझा प्रवास यशस्वी- सुर्यकांत खेतले
यावेळी चिपळूण सहकारी पतसंस्थेचे संचालक तथा चिपळूण पंचायत समितीचे सभापती सूर्यकांत खेतले यांनी आपल्या मनोगतात सुभाषराव चव्हाण यांनी माझ्यातील माणूस आणि क्षमता ओळखून त्यांच्या आशीर्वादामुळेच माझा प्रवास यशस्वी झाला, अशी भावना सुभाषराव चव्हाण यांच्याप्रती व्यक्त केली. सार्वजनिक जीवनात काम करतांना अनेकांच्या अडचणी सोडाव्या लागतात. त्यावेळी चव्हाण साहेबांनी आमच्या शब्दाला किंमत दिली. त्यामुळे समाजातील गरजू माणसाला मदत करण्यासाठी आम्हालाही बळ मिळाले. माझ्या आयुष्यात आणखी एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे चव्हाण साहेबांनी मला संस्थेच्या संचालक मंडळात काम करण्याची संधी दिली.
चिपळूण तालुक्याचा सभापती म्हणून काम करीत आहे. माझ्या या प्रवासात अनेकांचे योगदान आहे. मात्र, चिपळूण नागरी आणि विशेषत: चव्हाण साहेबांचा आशीर्वाद मार्गदर्शन यांचा वाटा मी कधीही विसरणार नाही. साहेबांनी चांगली माणसे हेरली. त्यांच्या क्षमतेवर विश्वास ठेवला आणि त्यांना पुढे आणले. त्यामुळे माझ्यासारख्या सामान्य माणसाला ही त्यांनी स्थान दिलं ही माझ्यासाठी आयुष्यभराची अभिमानाची गोष्ट आहे. आज मागे वळून पाहताना जाणवतं की एखाद्या मोठ्या माणसाचा हात डोक्यावर पडला तर सामान्य माणूस ही मोठा प्रवास करू शकतो, अशा शब्दात चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष चव्हाण सुभाषराव चव्हाण यांनी दिलेल्या पाठबळाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
सुभाषराव चव्हाण माझ्यासाठी केवळ आदर्श नव्हे, तर गुरु माऊली’- रवींद्र भोसले
चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालक रवींद्र भोसले यांनी आपल्या मनोगतात संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करताना आदर्श व्यक्तिमत्त्व घडविण्याबरोबरच अनेकांच्या जीवनाला दिशा देणारे सुभाषराव चव्हाण हे माझ्यासाठी केवळ आदर्श नसून गुरु माऊली आहेत. त्यांच्या सहवासातून सामाजिक क्षेत्रात काम करण्याची प्रेरणा आणि मार्गदर्शन मिळाल्याचे सांगताना त्यांनी त्यांच्या कार्याची तुलना ‘परिसा’शी केली. “सोन्याची किंमत असते; मात्र परिसाच्या स्पर्शाने लोखंडाचे सोने होते. चव्हाण साहेबांनीही आपल्या सहवासातील असंख्य सामान्य माणसांना आत्मविश्वास देत त्यांचे जीवन घडविले,” असे रवींद्र भोसले यांनी आपल्या मनोगतात नमूद केले. अडचणीच्या काळात अनेकांना आधार देत, त्यांच्या कार्याला दिशा देत आणि समाजातील माणसे घडविण्याचे काम चव्हाण साहेबांनी केले. त्यामुळे त्यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेली माणसे हीच त्यांच्या कार्याची खरी पावती असल्याचेही श्री. भोसले यांनी यावेळी शेवटी सांगितले.
यावेळी वासूअप्पा मेस्त्री, नरसिंग शिंदे, रमण डांगे, जे.के. शिंदे, पंचायत समितीच्या माजी सदस्या सौ. रेश्मा पवार, माजी सभापती रामदास राणे, शाहीर शाहीद खेरटकर, ज्येष्ठ पत्रकार सुभाष कदम, माजी नगरसेविका सौ. सीमा रानडे, चिपळूण नागरीचे समन्वयक अविनाश आंब्रे, खेडचे माजी सभापती विजय कदम यांनी आपल्या मनोगतातून सुभाषराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेची सुरू असलेली वाटचाल कौतुकास्पद असून त्यांनी अनेकांना सहकार्याचा हात दिला असून यातून अनेकजण स्वावलंबी झाले आहेत. सुभाषराव चव्हाण यांना दीर्घायुष्य मिळो, अशी सदिच्छा वाढदिनी या सर्व मान्यवरांनी व्यक्त केली. या कार्यक्रमासाठी चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे सभासद, हितचिंतक, लोकप्रतिनिधी, पत्रकार आदींनी उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल टाकळे यांनी केले.