माळ्यावरून पडून गंभीर जखमी झालेल्या हरचेरीतील वृद्धाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू

रत्‍नागिरी ः प्रतिनिधी
तालुक्यातील हरचेरी-कुंभारवाडी येथे घराच्या माळ्याची साफसफाई करत असताना खाली पडून गंभिर जखमी झालेल्या वृध्दाचा उपचारांदरम्यान सोमवार 7 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6.51 वा.सुमारास जिल्हा शासकिय रुग्णालयात मृत्‍यू झाला.
सुभाष गणपत साळवी (70,रा.हरचेरी-कुंभारवाडी,रत्‍नागिरी) असे उपचारांदरम्यान मृत्‍यू झालेल्या वृध्दाचे नाव आहे. याबाबत त्‍यांची विवाहित मुलगी प्रिती मंदार आष्टेकर (मुळ रा.डोंबिवली) यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात खबर दिली आहे. त्‍यानुसार, शनिवार 5 सप्टेंबर रोजी त्‍यांचे वडील सुभाष सावळी हे राहत्‍या घराच्या माळ्याची साफसफाई करत असताना माळ्यावरुन खाली पडले. यात त्‍यांच्या डोक्याला मार लागून त्‍यांच्या नाकातून रक्त येउ लागल्याने ते बेशूध्द पडले. त्‍यांना घरातील इतर सदस्य व शेजाऱ्यांनी तातडीने जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल करुन त्‍यांच्या मुलीला फोनव्दारे याची माहिती दिली. दरम्यान, सोमवार 7 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6.51 वा.सुमारास उपचारांदरम्यान सुभाष सावळी यांचा जिल्हा शासकिय रुग्णालयात मृत्‍यू झाला. याबाबत ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्‍यूची नोंद करण्यात आली आहे.