कुडाळ न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल; कायदेशीर देणे असल्याचे फिर्यादीला सिद्ध करता न आल्याने दिलासा
कुडाळ : माणगाव येथील बॅन्टो ग्रेगरी रॉड्रिक्स यांनी दाखल केलेल्या धनादेश अनादर प्रकरणात कुडाळ येथील न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग मा. श्रीमती नम्रता ए. बकरे यांच्या न्यायालयाने आरोपी विनायक बाळकृष्ण कुडतरकर (वय ४५, रा. माणगाव बाजार) यांची निर्दोष मुक्तता केली. तब्बल पाच वर्षे पाच महिन्यांच्या प्रदीर्घ सुनावणीनंतर १ सप्टेंबर २०२६ रोजी न्यायालयाने हा निकाल दिला.
या प्रकरणातील घटनेनुसार, फिर्यादी बॅन्टो ग्रेगरी रॉड्रिक्स यांच्या वडिलांनी आरोपी विनायक कुडतरकर यांना कर्जफेडीसाठी वेळोवेळी एकूण १० लाख रुपये दिल्याचा दावा करण्यात आला होता. सदर रक्कम १० ऑगस्ट २०१९ पर्यंत आरोपीला देण्यात आली असून, ती चार महिन्यांत परतफेड करण्याचे आश्वासन देत आरोपीने करार केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले होते.
यानंतर सदर रकमेच्या परतफेडीसाठी आरोपीने १० लाख रुपयांचा धनादेश दिला. मात्र, आरोपीच्या बँक खात्यात पुरेशी रक्कम उपलब्ध नसल्याने धनादेश वटला नाही. त्यामुळे फिर्यादीने आरोपीविरोधात चलनक्षम लिखत अधिनियमातील कलम १३८ अन्वये कुडाळ न्यायालयात तक्रार दाखल केली होती.
मात्र, आरोपीकडून फिर्यादीला १० लाख रुपयांची कायदेशीर देणी असल्याचे आवश्यक पुराव्यांद्वारे सिद्ध करण्यात फिर्यादी पक्षाला यश आले नाही. त्यामुळे न्यायालयाने आरोपी विनायक बाळकृष्ण कुडतरकर यांची या प्रकरणातून निर्दोष मुक्तता केली.
आरोपीतर्फे ॲड. आर. डी. बिले यांनी प्रभावीपणे बाजू मांडली. त्यांना ॲड. दत्ताराम राजीव बिले, ॲड. हेमांगी वराडकर आणि ॲड. तेजस सावंत यांनी सहकार्य केले.













