वेंगुर्ले : दाजी नाईक
जीवनाकडे कायम सहज आणि सकारात्मक दृष्टिकोनातून बघा. आपल्या हाताखाली काम करणारा माणूस मग भले तो शिपाई असू दे. त्याला सुद्धा आदराने बोलवा. आपल्याला जीवन जगण्याची तत्त्वज्ञान जे मिळते ते कोणत्या ना कोणत्या पुस्तकातून मिळते. म्हणून पुस्तकांचे वाचन करा. मोबाईल व टि.व्ही. यातून काय चांगले घेता येईल ते पहा. साहित्यिक आपल्याला जगायला शिकवतात म्हणून साहित्यिकांच्या सहवासात राहा त्यांच्या वागण्या बोलण्यातूनही आपण खूप काही शिकू शकतो. शिक्षकाने आपले काम करताना वेळेचे बंधन पाळू नये. वाचायला लागा वाचायला लावा. साहित्य आणि शिक्षण हे अलग होऊ शकत नाही. मुख्याध्यापक हा शाळेचा आरसा असतो. तो नेहमीच स्वच्छ ठेवा. असे प्रतिपादन डाॅक्टर सर्जेराव गर्जे यांनी केले. ते आनंदयात्री वाङ्मय मंडळाने आयोजित केलेल्या मुख्याध्यापक सन्मान सोहळ्यात बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर उद्योजक सचिन दळवी, मा. मुख्याध्यापक आत्माराम सोकटे, नगरसेविका ॲड. सुषमा प्रभूखानोलकर, ज्येष्ठ लेखिका वृंदा कांबळी, निवृत्त मुख्याध्यापक एस.एस. काळे, पी.एस कौलापुरे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरूवातीला वेंगुर्ल्यातील पत्रकार के. जी. गावडे याना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर दीप प्रज्वलन करून सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. प्रास्ताविक स्वागत व मान्यवरांचा परिचय आनंदयात्रीच्या अध्यक्ष वृंदा कांबळी यानी करून दिला. आत्माराम सोकटे, सचिन दळवी, नगरेविका ॲड. सुषमा प्रभूखानोलकर, काळे सर यानी मुख्याध्यापकांना शुभेच्छा दिल्या.
शिक्षक दिनानिमित्त झालेल्या सन्मानाने मुख्याध्यापक भारावले
शिक्षक दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमात वेंगुर्ला तालुक्यातील मराठी माध्यमाच्या माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांचा सन्मान करण्यात आले. या सन्मानाने मुख्याध्यापक भारावले. यामध्ये मंगेश कांबळी, सुशांत धुरी, राजेश घाटवळ, प्रकाश खोत, विनायक कोल्हे, अश्वमी भिसे, कैलास खराबडे, भावना धुरी, श्रद्धा नाईक, राजू परीट, सुनिल आत्माराम जाधव, सुनिल गंगाराम जाधव, किशोर सोनसूरकर, प्रतापराव देसाई इत्यादी आजी मुख्याध्यापकांचा व श्यामराव काळे व आत्माराम सोकटे या माजी मुख्याध्यापकांचा शाल श्रीफल, पुष्पगुच्छ व मानपत्र देऊन मान्यवरांच्याहस्ते सन्मान करण्यात आला. मुख्याध्यापक संघाचे वेंगुर्ला तालुकाध्यक्ष किशोर सोनसूरकर व मातोंड हायस्कूलचे मुख्याध्यापक परीट सर यानी मनोगतात कार्यक्रमा विषयी चांगल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. अवधूत नाईक व डाॅक्टर सचिन परूळकर यानी सूत्रसंचलन केले. आभार संजय पाटील यानी मानले.













