उभादांडा गावच्या सुपुत्रांची संगीत क्षेत्रात नवी भरारी; ‘यावे तुम्ही गणराया’ भक्तिगीताचे लोकार्पण

 

वेंगुर्ले : प्रतिनिधी

वेंगुर्ले तालुक्यातील उभादांडा गावचे सुपुत्र उल्हास आणि राजेंद्र तिरोडकर यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली तयार झालेले नवीन मराठी भक्तिगीत ‘यावे तुम्ही गणराया’ हे गाणे दि. ९ सप्टेंबर २०२६ रोजी ‘UR Music Creations’ या YouTube चॅनेलवर प्रदर्शित झाले.

या भक्तिगीताचे संगीत दिग्दर्शन उल्हास-राजेंद्र यांनी केले असून, गीतकार राजेंद्र तिरोडकर आहेत. गाण्याचे संगीत संयोजन उल्हास तिरोडकर यांनी केले आहे.

उल्हास आणि राजेंद्र हे आपल्या नोकरीची जबाबदारी सांभाळत संगीताची कला जोपासत असून, संगीत क्षेत्रात सातत्याने नवनवीन निर्मिती करण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. त्यांच्या या संगीतप्रवासामुळे उभादांडा तसेच समस्त वेंगुर्लेवासीयांमध्ये आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण आहे.

यापूर्वीही या दोन्ही बंधूंनी ‘चिंचपोकळीचा चिंतामणी’ तसेच ‘बाळासाहेब परत या’ यांसारख्या अल्बम्ससाठी संगीत दिग्दर्शक म्हणून काम केले आहे. संगीतप्रेमी रसिकांना विविध प्रकारच्या दर्जेदार गाण्यांची मेजवानी देण्याच्या उद्देशाने त्यांनी ‘UR Music Creations’ या नावाने YouTube चॅनेल सुरू केले आहे. या माध्यमातून आगामी काळातही नवनवीन गाणी आणि संगीतनिर्मिती रसिकांच्या भेटीला येणार आहे.

‘यावे तुम्ही गणराया’ या भक्तिगीताला संगीतप्रेमी रसिकांनी भरभरून प्रतिसाद द्यावा, असे आवाहन उल्हास-राजेंद्र यांनी केले आहे.