वैभववाडी तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत अर्जुन रावराणे विद्यालयाचा संघ विजेता

जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड

वैभववाडी प्रतिनिधी :
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वैभववाडी तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा २०२६-२७ मध्ये वैभववाडी येथील अर्जुन रावराणे विद्यालय, जयेंद्र दत्ताराम रावराणे सेमी इंग्लिश स्कूलच्या १४ वर्षांखालील मुलांच्या कबड्डी संघाने दमदार कामगिरी करत तालुकास्तरीय विजेतेपद पटकावले.

अंतिम सामन्यात अर्जुन रावराणे विद्यालयाच्या संघाने कोळपे उर्दू हायस्कूलच्या संघावर मात करत शानदार विजय मिळविला. या विजयासह विद्यालयाच्या संघाने तालुक्यात अव्वल स्थान पटकावले असून, आता जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत वैभववाडी तालुक्याचे प्रतिनिधित्व करण्याचा मान मिळविला आहे.

संघाच्या या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे, प्रशालेचे मुख्याध्यापक नादकर सर, शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विजयी संघाचे अभिनंदन केले. तसेच जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी संघाला शुभेच्छा दिल्या.
कबड्डी संघाला क्रीडा शिक्षक तुळसणकर एस. टी. व चौगले आर. बी. यांचे मार्गदर्शन लाभले.