सामाजिक कार्यकर्ते डी. के. सुतार यांचे तहसीलदारांना निवेदन
वैभववाडी प्रतिनिधी :
वैभववाडी शहरातील मोक्याच्या ठिकाणी तातडीने सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डी. के. सुतार यांनी तहसीलदार वैभववाडी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
वैभववाडी शहरातील अनेक ठिकाणी असलेली सीसीटीव्ही यंत्रणा गेल्या अनेक महिन्यांपासून बंद असल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. गुरुवारी वैभववाडी बसस्थानकात एसटी बसमध्ये चढताना एका वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याची माळ अज्ञात चोरट्याने लंपास केली. बसस्थानक परिसरात सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित असती, तर चोरट्याची ओळख पटवून त्याचा शोध घेणे पोलिसांना सोपे झाले असते. मात्र, सीसीटीव्ही यंत्रणा बंद असल्याने पोलिसांसमोर चोरट्याचा शोध घेण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे.
दरम्यान, गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. गणेशोत्सवानिमित्त मुंबई, पुणे आदी मोठ्या शहरांतून मोठ्या संख्येने चाकरमानी आपल्या मूळ गावी येत असतात. त्यामुळे वैभववाडी बाजारपेठेत मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. गर्दीच्या काळात चोरी तसेच इतर अनुचित प्रकार घडण्याची शक्यता लक्षात घेता शहरातील प्रमुख व मोक्याच्या ठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करणे आवश्यक आहे.
नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने वैभववाडी शहरातील बंद असलेली सीसीटीव्ही यंत्रणा तातडीने सुरू करावी तसेच आवश्यक त्या ठिकाणी नवीन सीसीटीव्ही बसविण्यासाठी संबंधित यंत्रणेला सूचना द्याव्यात, अशी मागणी डी.के. सुतार यांनी तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे.













