कणकवली : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कणकवली शहरातील अतिक्रमण व अनधिकृत स्टॉलविरोधात नगरपंचायतीने पुन्हा कारवाईची भूमिका घेतली आहे. पटवर्धन चौकात नव्याने उभारण्यात आलेल्या अवैध स्टॉलवर कारवाई करण्यासाठी नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी गौरी पाटील स्वतः गुरुवारी दुपारी १२ वाजता घटनास्थळी दाखल झाल्या. स्टॉल हटविण्याच्या कारवाईदरम्यान त्यांनी संबंधित स्टॉलधारकांसह सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांना चांगलेच सुनावले. पटवर्धन चौकात पुन्हा स्टॉल उभारण्यात आल्याचे निदर्शनास आल्यानंतर नगरपंचायतीकडून कारवाई सुरू करण्यात आली. यावेळी मुख्याधिकारी गौरी पाटील यांनी स्टॉल तातडीने हटविण्याच्या सूचना केल्या. कारवाईदरम्यान त्यांनी एका सत्ताधारी व्यक्तीला ‘हेच काय नियोजन? तातडीने काढा तो स्टॉल…तेव्हा माझ्या अंगावर आलेलात!’ अशा शब्दांत तीव्र नाराजी व्यक्त केली.
कणकवली शहरातील अतिक्रमण व अनधिकृत स्टॉल हटविण्याची मोहीम यापूर्वी नगरपंचायतीकडून राबविण्यात आली होती. त्यावेळी काही स्टॉलधारकांच्या वतीने स्टॉल स्वतःहून हटविण्यात येतील, असे सांगण्यात आले होते. त्यामुळे नगरपंचायतीच्या कारवाईला काही काळ पूर्णविराम मिळाला होता. मात्र, गणेशोत्सवाच्या तोंडावर पटवर्धन चौकात पुन्हा नव्याने स्टॉल उभारण्यात आल्याने अतिक्रमणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला.
गणेशोत्सव काळात कणकवली शहरात मोठ्या प्रमाणात नागरिकांची वर्दळ वाढते. पटवर्धन चौक हा शहरातील महत्त्वाचा वाहतूक मार्ग असल्याने या ठिकाणी अनधिकृत स्टॉल किंवा अतिक्रमणामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे रस्ते, चौक तसेच सार्वजनिक ठिकाणे अतिक्रमणमुक्त ठेवण्याच्या दृष्टीने नगरपंचायतीने कारवाई सुरू केली आहे.
दरम्यान, गणेशोत्सवाच्या काळात शहरातील वाहतूक सुरळीत राहावी आणि नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी अनधिकृत स्टॉल व अतिक्रमणाबाबत नगरपंचायत प्रशासनाने कठोर भूमिका घेतल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे.











