पार्किंग व्यवस्थेसह कृत्रिम तलाव, निर्माल्य कलश
पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी स्पर्धेचे आयोजन
कणकवली : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कणकवली नगरपंचायतीने शहरातील वाहतूक व पार्किंग व्यवस्था, गणेश विसर्जनासाठी कृत्रिम तलाव, निर्माल्य संकलन तसेच आपत्ती निवारणासाठी विशेष नियोजन केले आहे. गणेशोत्सव काळात नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये आणि उत्सव आनंददायी व सुरळीत पार पडावा, यासाठी नगरपंचायतीमार्फत विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. गणेशोत्सवाच्या काळात कणकवली शहरात मोठ्या प्रमाणात नागरिकांची व वाहनांची वर्दळ वाढते. ही गर्दी नियंत्रणात ठेवण्यासाठी नगरपंचायतीने पार्किंगचे नियोजन केले असून, वन-वे, नो-वे, नो-पार्किंग तसेच दुचाकी आणि चारचाकी वाहनांसाठी स्वतंत्र पार्किंग व्यवस्थेचे नियोजन करण्यात आले आहे. याबाबत नागरिकांना माहिती मिळावी यासाठी शहरातील विविध ठिकाणी दिशादर्शक व पार्किंगचे फलक लावण्यात येणार आहेत. शहरातील दोन प्रमुख चौकांमध्ये पार्किंग व्यवस्थेबाबतची माहिती देणारे फलकही लावण्यात येणार आहेत.
नियोजित पार्किंग व्यवस्थेचा नागरिकांनी वापर करून पोलिस अधिकारी, पोलिस कर्मचारी आणि नगरपंचायत कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन कणकवली नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी गौरी पाटील यांनी केले आहे.
नागरिकांच्या सहकार्यामुळे शहरातील गर्दीवर नियंत्रण ठेवण्यास तसेच बाजारपेठेवर वाहतुकीचा होणारा परिणाम कमी करण्यास मदत होणार आहे. यंदा कणकवली नगरपंचायतीमार्फत पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी विशेष स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत प्रथम क्रमांकासाठी ५ हजार रुपये, द्वितीय क्रमांकासाठी ३ हजार रुपये तर तृतीय क्रमांकासाठी २ हजार रुपये अशी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. स्पर्धेत सहभागी होण्यासाठीचे नियम व अटी लवकरच जाहीर करण्यात येणार असून, नगरपंचायतीच्या सोशल मीडिया माध्यमांवर तसेच प्रेस नोटद्वारे याबाबतची माहिती नागरिकांना देण्यात येणार आहे.
कणकवली हे शहर असून येथील नागरिकांचे माती आणि पर्यावरणाशी असलेले नाते लक्षात घेऊन जास्तीत जास्त नागरिकांनी पर्यावरणपूरक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन मुख्याधिकारी गौरी पाटील यांनी केले. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींच्या विसर्जनामुळे नदी, तलाव आणि अन्य जलस्रोतांचे प्रदूषण होण्याचा धोका असतो. त्यामुळे जलस्रोतांचे प्रदूषण कमी करण्यासाठी नगरपंचायतीमार्फत कृत्रिम तलावांची व्यवस्था करण्यात येणार आहे. नागरिकांनी शक्य तितक्या मोठ्या प्रमाणात या कृत्रिम तलावांचा वापर करून गणेशमूर्तींचे विसर्जन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच गणेश विसर्जनाच्या ठिकाणी निर्माल्य कलश ठेवण्यात येणार असून नागरिकांनी निर्माल्य नदीमध्ये न टाकता उपलब्ध करून देण्यात आलेल्या निर्माल्य कलशांचा वापर करावा, असेही आवाहन करण्यात आले आहे. यामुळे जलस्रोतांमध्ये होणारे प्रदूषण रोखण्यास मदत होणार आहे. गणेशोत्सवाच्या काळात उद्भवणाऱ्या संभाव्य आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी कणकवली नगरपंचायतीमार्फत आपत्ती निवारण कक्ष सुरू करण्यात आला आहे. या कक्षामध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचे संपर्क क्रमांक नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तसेच शहरातील काही प्रमुख ठिकाणी असलेल्या नोटीस बोर्डवरही हे संपर्क क्रमांक लावण्यात येणार आहेत. गणेशोत्सव हा सर्वांसाठी आनंदाचा आणि उत्साहाचा सण असून, तो सुरक्षित, शिस्तबद्ध व पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्यासाठी नगरपंचायतीने केलेल्या नियोजनाला नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन मुख्याधिकारी गौरी पाटील यांनी केले आहे.













