जिल्हा नियोजन योजनेअंतर्गत सात्विणगाव येथे उपक्रम; पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते होणार शुभारंभ
खेड (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाच्या वन विभागामार्फत रत्नागिरी वनविभागाच्या चिपळूण विभागाच्या माध्यमातून जिल्हा नियोजन योजना २०२४-२५ अंतर्गत खेड तालुक्यातील सात्विणगाव येथे उभारण्यात आलेल्या ‘निसर्ग माहिती केंद्रा’चा उद्घाटन समारंभ शनिवार, १२ सप्टेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता आयोजित करण्यात आलेला आहे. या केंद्राचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे उद्योग, मराठी भाषा मंत्री तसेच रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. डॉ. उदय रवींद्र सामंत यांच्या शुभहस्ते होणार आहे.
वनसंपदा, जैवविविधता आणि निसर्ग संवर्धनाबाबत नागरिकांमध्ये विशेषतः विद्यार्थी व नव्या पिढीत जनजागृती निर्माण करण्याच्या दृष्टीने निसर्ग माहिती केंद्राची उभारणी करण्यात आली आहे. वन विभागाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या अशा उपक्रमांमुळे स्थानिक पातळीवरील निसर्गसंपदा, वन्यजीव, पक्षी, जैवविविधता आणि पर्यावरण संवर्धनाची माहिती सर्वसामान्यांना अधिक जवळून समजण्यास मदत होणार आहे.
उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद रत्नागिरीच्या अध्यक्षा श्रीमती अस्मिता केद्रे राहणार असून राज्याचे महसूल, ग्रामविकास व पंचायतराज, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण आणि अन्न व औषध प्रशासन मंत्री मा. ना. श्री. योगेश ज्योती रामदास कदम यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
या कार्यक्रमास लोकसभा सदस्य सुनील तटकरे, खा. नारायण राणे, विधान परिषद सदस्य ज्ञानेश्वर म्हात्रे, ॲड. निरंजन डावखरे, विधान परिषद सदस्य अनिकेत तटकरे, प्रमोद जठार, विधानसभा सदस्य शेखर निकम, भास्कर जाधव तसेच विधानसभा सदस्य किरण सामंत यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
या कार्यक्रमासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वैदेही रानडे आणि जिल्हाधिकारी मंजुषा जिंदल हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. वन विभागाच्या वतीने परिक्षेत्र वन अधिकारी राजेंद्र पाटील, सहाय्यक वनसंरक्षक रत्नागिरी श्रीमती प्रियंका लगड तसेच विभागीय वनाधिकारी रत्नागिरी (चिपळूण) श्रीमती गिरिजा देसाई यांचीही उपस्थिती राहणार आहे.
निसर्ग माहिती केंद्रात वन्यजीव व जैवविविधतेशी संबंधित माहिती, नमुने आणि विविध शैक्षणिक साहित्याच्या माध्यमातून पर्यावरणाविषयी माहिती उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे उद्घाटनाच्या निमंत्रणपत्रिकेवरून स्पष्ट होते. केंद्रामध्ये पक्षी, वन्यजीव तसेच विविध नैसर्गिक घटकांशी संबंधित माहितीचे प्रदर्शन करण्यात आले आहे. त्यामुळे शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह पर्यटक, निसर्गप्रेमी आणि स्थानिक नागरिकांसाठी हे केंद्र निसर्ग शिक्षण व जनजागृतीचे महत्त्वाचे माध्यम ठरण्याची अपेक्षा आहे.
रत्नागिरी जिल्ह्याला समृद्ध समुद्रकिनारा, सह्याद्री पर्वतरांग, घनदाट वनक्षेत्र आणि वैविध्यपूर्ण जैवसंपदा लाभली आहे. या नैसर्गिक वारशाचे संवर्धन करताना स्थानिक नागरिकांचा सहभाग वाढविणे आणि भावी पिढीला पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व पटवून देणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर खेड तालुक्यातील निसर्ग माहिती केंद्राचा उपक्रम महत्त्वपूर्ण मानला जात आहे.
शनिवार, १२ सप्टेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता सात्विणगाव, ता. खेड, जि. रत्नागिरी येथे हा उद्घाटन समारंभ होणार असून वन विभागाच्या या उपक्रमाकडे पर्यावरणप्रेमी आणि स्थानिक नागरिकांचे लक्ष लागले आहे.













