स्थानिकांच्या हिताशी कोणतीही तडजोड न करता प्रस्तावित ऊर्जा प्रकल्पाचा विचार!

गृह राज्यमंत्री योगेश कदम यांची स्पष्ट भूमिका;

प्रशांत कांबळे : दापोली
कोकणातील जमीन, पर्यावरण, पर्यटन, शेती आणि स्थानिकांची उपजीविका या बाबी संवेदनशील असल्याने कोणत्याही मोठ्या प्रकल्पाचा विचार करताना विकास आणि स्थानिक हित यांचा समतोल साधणे अत्यावश्यक असल्याचे सांगत, स्थानिक जनतेच्या हिताशी जोडला जाणारा असेल तरच त्याबाबत सकारात्मक विचार केला जाईल, अशी स्पष्ट भूमिका गृह राज्यमंत्री तथा दापोलीचे आमदार योगेश कदम यांनी मांडली आहे.
दापोली तालुक्यात प्रस्तावित असलेल्या मोठ्या ऊर्जा प्रकल्पाच्या चर्चेला वेग आला असतानाच, या प्रकल्पाकडे केवळ मोठी गुंतवणूक म्हणून नव्हे, तर, स्थानिक जीवनमानाच्या हिताच्या दृष्टीनेही त्याकडे पाहणे महत्वाचं असल्याची भूमिका नाम. योगेश कदम यांनी आज व्यक्त केली. प्रस्तावित ऊर्जा प्रकल्पाबाबत पत्रकारांनी योगेश कदम यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी ही भूमिका स्पष्ट केली. आज सकाळीच या संभाव्य प्रकल्पाबाबत आपल्याला प्राथमिक माहिती मिळाली असून, प्रकल्पाची संपूर्ण आणि इत्यंभूत माहिती घेतल्याशिवाय कोणतीही भूमिका घेणे योग्य ठरणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दापोली तालुक्यातील भिवबंदर-आघारी परिसरात प्रस्तावित असलेल्या या प्रकल्पामुळे कोकणच्या ऊर्जा क्षेत्रात मोठी गुंतवणूक येण्याची शक्यता व्यक्त होत आहे. जेएसडब्ल्यू एनर्जीच्या माध्यमातून तब्बल ४४ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा संभाव्य प्रकल्प असल्याची चर्चा आहे. प्रकल्पाची अंमलबजावणी झाल्यास मोठ्या क्षमतेची ऊर्जा निर्मिती, पायाभूत सुविधा आणि रोजगाराच्या संधी निर्माण होण्याची शक्यता आहे. मात्र, या तांत्रिक आणि आर्थिक बाबींपेक्षा स्थानिक जनतेला त्याचा प्रत्यक्ष फायदा काय मिळणार?, हा प्रश्न अधिक महत्त्वाचा असल्याचे कदम यांच्या भूमिकेतून स्पष्ट झाले आहे.
एखादा मोठा उद्योग किंवा ऊर्जा प्रकल्प तालुक्यात येत असल्याने त्याचे स्वागत करणे ही एक बाजू आहे; मात्र त्या प्रकल्पाचा स्थानिकांच्या जीवनमानावर, रोजगारावर, व्यवसायावर, पर्यावरणावर आणि परिसराच्या भवितव्यावर नेमका काय परिणाम होणार, याचा सर्वंकष विचार होणे आवश्यक आहे.
याच मुद्द्यावर योगेश कदम यांनी विशेष भर दिला आहे.
“प्रकल्प किती मोठा आहे, गुंतवणूक किती हजार कोटींची आहे, यापेक्षा त्याचा स्थानिक जनतेला किती आणि कशा प्रकारे फायदा होणार आहे, हे महत्त्वाचे आहे,” अशीच भूमिका कदम यांनी पत्रकारांशी झालेल्या चर्चेत अधोरेखित केली.
प्रस्तावित प्रकल्पाबाबत अद्याप प्राथमिक माहितीच मिळाली असल्याचे सांगताना कदम यांनी कोणताही पूर्वग्रह न ठेवता प्रकल्पाचा सविस्तर अभ्यास करण्याची भूमिका घेतली आहे.
प्रकल्पाचे स्वरूप काय आहे, किती जमीन आवश्यक आहे, पर्यावरणीय परिणाम काय असतील, स्थानिकांना किती रोजगार उपलब्ध होणार आहे, स्थानिकांच्या मालमत्ता व उपजीविकेवर त्याचा परिणाम काय होईल, प्रकल्पातून स्थानिक स्वराज्य संस्थांना आणि शासनाला काय लाभ मिळणार आहे, तसेच परिसराच्या पायाभूत सुविधांवर त्याचा काय परिणाम होणार आहे, या सर्व बाबींची माहिती घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
त्यामुळे प्रकल्प येतोय म्हणून लगेच होकार आणि प्रकल्पाला विरोध म्हणून लगेच नकार अशा दोन्ही टोकाच्या भूमिका न घेता, वस्तुस्थिती समजून घेतल्यानंतरच निर्णय घेण्याचे ठाम मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
दापोली आणि कोकणचा विकास व्हावा, मोठी गुंतवणूक यावी, रोजगारनिर्मिती व्हावी, याला विरोध असण्याचे कारण नाही. मात्र विकासाच्या नावाखाली स्थानिकांच्या हिताकडे दुर्लक्ष होता कामा नये, ही भूमिका कदम यांनी स्पष्ट केली आहे. त्यामुळे प्रस्तावित ऊर्जा प्रकल्पाबाबत आता पुढील काळात प्रकल्पाची सविस्तर माहिती, तांत्रिक बाबी, पर्यावरणीय परिणाम आणि स्थानिकांसाठी असणारे लाभ यांचा अभ्यास महत्त्वाचा ठरणार आहे. तो सर्वंकष विचार करूनच यासंदर्भातील आपली भूमिका आपण स्पष्ट करू. असे त्यांनी सांगितले आहे.