सावंतवाडी: ‘माझी वसुंधरा अभियान’ आणि ‘स्वच्छ सर्वेक्षण’ अंतर्गत सावंतवाडी नगर परिषदेच्या वतीने शहरात पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी विशेष मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. “चला… गणरायाचे स्वागत करूया, निसर्गाचे रक्षण करूया!” असा संदेश देत नगर परिषदेने शहरातील नागरिक व गणेशोत्सव मंडळांना सर्व नियमांचे तंतोतंत पालन करण्याचे आवाहन केले आहे.
पर्यावरणाचे रक्षण व्हावे या उद्देशाने प्लास्टर ऑफ पॅरिस (POP) व रासायनिक रंगांचा वापर टाळून शाडू अथवा नैसर्गिक मातीची गणेशमूर्ती वापरणे आणि तिला निसर्गास अनुकूल रंग देणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच सार्वजनिक विहीर, तलाव, नदी किंवा नैसर्गिक जलसोतांमध्ये मूर्ती विसर्जन न करता नगर परिषदेने उपलब्ध करून दिलेल्या कृत्रिम विसर्जन तलावाचा किंवा विसर्जन कुंडाचा वापर करण्याचे सूचित करण्यात आले आहे. शक्य असल्यास घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन घरच्या घरीच करावे, असेही नगर परिषदेने म्हटले आहे.
कचरा व्यवस्थापनावर भर देताना फुले, हार व पानांचे निर्माल्य कचऱ्यात न मिसळता ते स्वतंत्रपणे निर्माल्य कलशात जमा करून खत निर्मितीस सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. याशिवाय ओला, सुका व घातक कचरा स्वतंत्रपणे देणे अनिवार्य असून प्लास्टिक व थर्माकोलच्या वापरावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. सजावटीसाठी देखील थर्माकोलऐवजी नैसर्गिक फुले, कापड, कागद, बांबू व लाकूड यांचा वापर करावा आणि मागील वर्षातील सजावट साहित्याचा पुनर्वापर करावा, असे सुचवण्यात आले आहे.
ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी मोठ्या आवाजातील लाऊडस्पीकर व डीजेचा वापर टाळून शासनाने निर्धारित केलेल्या ध्वनीमर्यादा व वेळेचे पालन करणे आवश्यक आहे. रोषणाईसाठी LED दिव्यांचा किंवा सौरऊर्जेचा वापर करून वीज बचत करण्याचे आणि ‘एक गणेशोत्सव – एक वृक्ष’ या संकल्पनेनुसार परिसरात वृक्षारोपण करून परिसर स्वच्छ व हिरवागार ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सावंतवाडी नगर परिषदेचे मा. नगराध्यक्ष, मा. उपनगराध्यक्ष, मा. मुख्याधिकारी, सर्व सभापती व सर्व नगरसेवकांनी नागरिकांना स्वच्छ आणि पर्यावरणपूरक पद्धतीने उत्सव साजरा करण्याचे आवाहन केले आहे.











