सावंतवाडीच्या विकासासाठी एकत्रित काम करण्याची ग्वाही
सावंतवाडी । प्रतिनिधी : माजी शालेय शिक्षण मंत्री तथा सावंतवाडीचे विद्यमान आमदार दीपक केसरकर यांनी सावंतवाडीच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा युवराज्ञी श्रद्धाराजे सावंत भोंसले यांची राजवाडा येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले आणि सावंतवाडी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्रितपणे काम करण्याची ग्वाही दिली.
आमदार दीपक केसरकर सध्या सावंतवाडी तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी नगराध्यक्षांची भेट घेऊन त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. सावंतवाडी शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी आणि नागरी सुविधांचा दर्जा उंचावण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांचा समन्वय आवश्यक असल्याचे केसरकर यावेळी म्हणाले.
या भेटीदरम्यान शहराच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर आणि आगामी विकासकामांवर सकारात्मक चर्चा झाली. सावंतवाडी शहराला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. या शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आपण सर्वांनी पक्षभेद विसरून एकत्रितपणे काम करूया. सावंतवाडीला राज्याच्या नकाशावर एक ‘आदर्श शहर’ म्हणून ओळख मिळवून देऊया, असा विश्वास आमदार केसरकर यांनी यावेळी व्यक्त केला.
नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले यांनी आमदार केसरकर यांच्या शुभेच्छांचा स्वीकार करत शहराच्या प्रगतीसाठी नेहमीच तत्पर राहणार असल्याचे सांगितले. या प्रसंगी युवराज लखमराजे भोंसले यांचीही प्रमुख उपस्थिती होती.













