कलापरंपरेचा समर्थ वारसदार! रेवंडीचे सिद्धहस्त मूर्तिकार तारक कांबळी

मसुरे | झुंजार पेडणेकर :मालवण तालुक्यातील रेवंडी गाव ही मुळातच कलावंतांची भूमी म्हणून ओळखली जाते. याच भूमीत जन्मलेल्या तारक शशिकांत कांबळी यांनी आपल्या पूर्वजांचा कलेचा वारसा केवळ जपलाच नाही, तर तो नव्या उंचीवर नेऊन ठेवला आहे. मागील 23 वर्षांपासून ते अतिशय निष्ठेने आणि उत्कृष्टतेने गणेशमूर्ती घडवण्याचे काम करत आहेत. अगदी बालवयापासून जोपासलेल्या या कलेच्या जोरावर आज त्यांनी सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांतील गणेशभक्तांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे.

*पाच पिढ्यांचा वारसा आणि कलेची साधना-

तारक कांबळी यांना मूर्तिकलेचे धडे घरातूनच मिळाले. त्यांचे वडील कै.शशी कांबळी आणि आजोबा कै. गिरीधर कांबळी हे सुद्धा नामवंत मूर्तिकार होते. पिढीजात मिळालेला हा कलेचा वारसा त्यांनी अत्यंत आत्मियतेने पुढे चालवला आहे. आजच्या आधुनिक युगात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींचे आकर्षण वाढत असले, तरी कांबळी यांच्या हाताने घडलेल्या मातीच्या (शाडूच्या) मूर्तींना गणेशभक्तांची पहिली पसंती असते. पर्यावरणपूरक मातीच्या मूर्ती घडवण्यात त्यांचा हातखंडा आहे.

मूर्तीतील रेखीवपणा अन् भावपूर्णता वाखाणण्या जोगा आहे.

तारक यांच्या मूर्तींचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे गणपतीच्या चेहऱ्यावरील प्रसन्न भाव, मूर्तीचा रेखीवपणा आणि सुटसुटीत रंगसंगती. विशेषतः बालमूर्ती घडवताना त्यात निष्पाप आणि वात्सल्यपूर्ण भाव आणण्यात ते कमालीचे तरबेज आहेत. मूर्तीचे सुबक फिनिशिंग आणि उठावदार रंगकाम यामुळे त्यांच्या गणेशशाळेतील मूर्ती पाहताच क्षणी डोळ्यांचे पारणे फेडतात. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मोठमोठ्या मूर्तींमध्ये जसा भव्यपणा असतो, तशीच भव्यता आणि सुबकता गणेशभक्तांच्या मागणीनुसार ते मातीच्या मूर्तींमध्ये हुबेहूब उतरवतात.

* अचूक नियोजन आणि सहकाऱ्यांची साथ

“कमी बोलणे आणि कृतीतून काम दाखवणे” हा तारक कांबळी यांचा शांत व संयमी स्वभाव त्यांच्या कामातही दिसून येतो. त्यांच्या या कलाप्रवासात त्यांच्या सहकाऱ्यांचीही उत्तम साथ लाभते. गणेशोत्सवाच्या धामधुमीत वेळेचे आणि कामाचे अचूक नियोजन असल्यामुळे, गणेश चतुर्थीच्या ३-४ दिवस आधीच त्यांच्या शाळेतील सर्व मूर्ती पूर्णपणे तयार असतात. त्यामुळे गणेशभक्तांना ऐनवेळी कोणतीही धावपळ न होता अत्यंत सुरक्षितपणे मूर्ती सुपूर्द केली जाते. भक्तांच्या मागणीनुसार ते पीओपीच्या मूर्तीही देतात, परंतु मातीच्या मूर्तींची मागणी दिवसेंदिवस वाढतच असून यावर्षी गोवा राज्यातून सुद्धा त्यांच्याकडे मातीच्या मूर्तीची विचारणा झाली आहे.

* उत्कृष्ट नेपथ्यकार आणि वेशभूषाकार-

तारक कांबळी हे केवळ गणपतीच्या मूर्तीपुरतेच मर्यादित नसून, ते एक उत्तम नेपथ्यकार आणि वेशभूषाकारही आहेत. ऐतिहासिक असो वा सामाजिक, कोणत्याही नाटकातील किंवा सांस्कृतिक कार्यक्रमातील व्यक्तिरेखांना जिवंत करण्याचे काम ते आपल्या उठावदार वेशभूषेतून आणि नेपथ्यातून करतात. कलासृष्टीतील त्यांच्या या बहुआयामी योगदानामुळे रेवंडीच्या कलापरंपरेला एक नवी ओळख मिळाली आहे.

अशा या शांत, नम्र आणि गुणी कलावंताच्या हातून अशीच नवनवीन कलाकृती घडत राहो आणि रेवंडीची कलापरंपरा अधिक समृद्ध होत राहो, हीच गणेशचरणी प्रार्थना!