मनोज जरांगे यांनी मुंबईला येऊ नये’; गणेशभक्तांची गैरसोय होणार नाही याची काळजी घ्या – उदय सामंत

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत येऊ नये, असे आवाहन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केले आहे.

मनोज जरांगे यांना त्यांच्या मागण्यांबाबत अनेकदा समजावून सांगण्यात आले असून, सरकारने त्यांच्या मागण्या मान्य केल्याचा दावा उदय सामंत यांनी केला आहे.

दरम्यान, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह महाराष्ट्रात मोठ्या संख्येने गणेशभक्त सहभागी होत असतात. त्यामुळे गणेशोत्सवात कोणतीही अडचण निर्माण होणार नाही, याची सर्वांनी काळजी घ्यावी, असे आवाहन सामंत यांनी केले.

गणेशभक्तांची गैरसोय होणार नाही, याची जबाबदारी घ्यावी. हिंदू सणामध्ये कोणताही अडथळा निर्माण होणार नाही, अशी भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घ्यावी, असेही उदय सामंत यांनी म्हटले आहे.

गणेशोत्सवाच्या काळात शांतता आणि सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहनही सामंत यांनी केले.