पर्यावरणपूरक घरगुती गणेशोत्सव रील्स स्पर्धा २०२६ चे सावंतवाडी नगरपरिषदेतर्फे आयोजन

सावंतवाडी:
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेतील अत्यंत महत्त्वाचा आणि उत्साहाचा सण असलेला गणेशोत्सव अधिकाधिक पर्यावरणपूरक, स्वच्छ व प्लास्टिकमुक्त पद्धतीने साजरा व्हावा, या उद्देशाने सावंतवाडी नगरपरिषदेमार्फत ‘माझी वसुंधरा अभियान ७.०’ व ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२६’ अंतर्गत “पर्यावरणपूरक घरगुती गणेशोत्सव रील्स स्पर्धा – २०२६” चे आयोजन करण्यात आले आहे.

​गणेशोत्सवाचा उत्साह कायम ठेवत पर्यावरणाचे संरक्षण, स्वच्छता आणि सामाजिक जबाबदारीचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून नागरिक, युवक-युवती तसेच विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सवाबाबत जनजागृती करणाऱ्या आकर्षक व संदेशपर रील्स तयार करायच्या आहेत.
​स्पर्धेत सहभागी होण्यासाठी स्पर्धकांनी आपल्या रीलमध्ये सावंतवाडी नगरपरिषदेच्या @sundarwadisawantwadi या अधिकृत सोशल मीडिया खात्याला Tag करणे आवश्यक आहे. तसेच रील पोस्ट करताना #EcoGaneshotsav2026, #SawantwadiNagarparishad आणि #पर्यावरणपूरकगणेशोत्सव2026 हे हॅशटॅग (Hashtags) वापरणे बंधनकारक आहे.

​या उपक्रमात शहरातील जास्तीत जास्त नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश घराघरांत पोहोचवावा, असे आवाहन सावंतवाडी नगरपरिषदेच्या मा. नगराध्यक्षा, मा. उपनगराध्यक्ष, मा. मुख्याधिकारी, सर्व सभापती व सर्व नगरसेवकांनी केले आहे.