स्वर्गीय भाऊ गावकर घराणे, कसबा-साळशी यांच्या वतीने उपक्रम
शिरगाव (प्रतिनिधी) : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक साहित्य उपलब्ध व्हावे आणि त्यांच्या शैक्षणिक वाटचालीला प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने देवगड तालुक्यातील साळशी येथील स्वर्गीय भाऊ गावकर घराणे, कसबा-साळशी यांच्या वतीने १०२ विद्यार्थ्यांना मोफत स्कूल बॅगचे वाटप करण्यात आले.
साळशी येथील माध्यमिक विद्यामंदिर, केंद्र शाळा साळशी, सरमळेवाडी शाळा तसेच देवणेवाडी, घाडीवाडी आणि गावकरवाडी अंगणवाडी अशा सर्व शाळातील विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते स्कूल बॅग देण्यात आल्या.
शैक्षणिक साहित्याची गरज लक्षात घेऊन राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी मर्यादित साधनसामग्रीतून शिक्षण घेत असतात. अशा विद्यार्थ्यांना आवश्यक साहित्याच्या माध्यमातून मदतीचा हात देणे आणि त्यांच्या शिक्षणाला बळ देणे, या भावनेतून हा उपक्रम राबविण्यात आला.
शिक्षणाला प्रोत्साहन देतानाच सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेशही या उपक्रमातून देण्यात आला.
यावेळी माध्यमिक विद्यामंदिर, साळशीचे मुख्याध्यापक संजय मराठे यांचा शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला.
विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत, गुणवंतांना प्रोत्साहन आणि शिक्षकांच्या कार्याचा गौरव अशा विविध उपक्रमांतून स्वर्गीय भाऊ गावकर घराण्याने सामाजिक बांधिलकीची परंपरा जपली आहे.
या कार्यक्रमाला राजेश लाड, सदानंद गावकर, विजय लाड, सुनील गावकर, रवींद्र लाड, वैभव साळसकर, सत्यवान सावंत, उपसरपंच पांडुरंग मिराशी, साळशी शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा त्रिषा गावकर, प्रकाश किंजवडेकर, राजेंद्र साटम, पुरुषोत्तम साटम, साळशी शाळेचे मुख्याध्यापक प्रकाश झाडे, स्मिता कोदले, सरमळेवाडी शाळेचे मुख्याध्यापक समाधान कोळी, सहशिक्षक वैभव येलेकर, अंगणवाडी सेविका प्रतीक्षा शिवलकर, अस्मिता मेस्त्री, मनिषा नाईक, मदतनीस प्रतिक्षा किंजवडेकर आदी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत, गुणवंतांना प्रोत्साहन आणि शिक्षकांच्या कार्याचा गौरव अशा विविध उपक्रमांतून स्वर्गीय भाऊ गावकर घराण्याने सामाजिक बांधिलकीची परंपरा जपली आहे.
तसेच यावेळी माध्यमिक विद्यामंदिर, साळशी मधील विद्यार्थ्यानी दहावीच्या परीक्षेत ७५ टक्के किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्यांना टॅब संगणकाचे बक्षीस देण्यात येणार असल्याची घोषणा यावेळी करण्यात आली.










