अखेर ‘त्या’ साठ कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांचे वेतन खात्यात जमा

​​आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाला जाग

​सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडी शहरातील जवळपास ६० कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांना अखेर मोठा दिलासा मिळाला आहे. अनेक दिवसांपासून रखडलेले आणि सणासुदीच्या काळातही न मिळालेले त्यांचे वेतन त्यांच्या बँक खात्यात जमा झाले आहे. माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाने त्वरीत ही कार्यवाही केली.
​गेल्या तीन वर्षांपासून भविष्य निर्वाह निधी (PF) थकीत असल्याने आणि एक महिन्याचा पगार देण्याचे आश्वासनही न पाळल्याने या कामगारांमध्ये तीव्र असंतोष होता. त्यामुळे, १५ सप्टेंबर रोजी बेमुदत उपोषणावर बसण्याचा इशारा कामगारांनी दिला होता.

या इशाऱ्यानंतरच प्रशासनाने तातडीने पावले उचलली.
​माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच शहरातील गुरुकुल येथे कंत्राटी सफाई कामगारांची एक बैठक पार पडली होती. या बैठकीत कामगारांनी नगरपरिषदेच्या ढिसाळ कारभारावर जोरदार टीका केली. यापूर्वी, प्रशासक तथा प्रांताधिकारी हेमंत निकम यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत पगार आणि पीएफ देण्याचे आश्वासन दिले गेले होते. मात्र, अधिकाऱ्यांनी ‘तांत्रिक कारणे’ पुढे करत त्यावर कोणतीही कार्यवाही केली नाही, असा आरोप कामगारांनी केला होता. सणासुदीच्या तोंडावर पगार न मिळाल्याने त्यांच्या कुटुंबांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागले होते, ज्यामुळे कामगारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती.

​या इशाऱ्याचा परिणाम म्हणून, प्रशासनाला जाग आली आणि त्यांनी कामगारांचे पगार तातडीने अदा केले. बबन साळगावकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज (गुरुवार) ६० कामगारांच्या खात्यात पैसे जमा करण्यात आले आहेत. यामुळे कामगारांच्या लढ्याला यश मिळाले असून, त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.