कोकण वार्तापत्र
संतोष वायंगणकर
कोकणच्या गणेशोत्सवात निसर्गाशी असलेले अतूट नाते स्पष्टपणे दिसून येते. गणरायाच्या डोक्यावर बांधली जाणारी माटोळी ही याची मोठी साक्ष आहे. विविध प्रकारची रानफळे, रानफुले, कौंडळे, सुपारी बेडे, कांगले, बांबूच्या काठ्या आणि औषधी वनस्पतींचा वापर करून तयार केलेली आरास ही कोकणच्या पारंपरिक संस्कृतीचे दर्शन घडवते. गणेशोत्सव केवळ गणपतीची पूजा आणी भजन करण्याचा उत्सव नाही…तो मुळगाव, पूर्वज, कुलपरंपरा, घराणे, नाती आणि आपल्या मातीशी असलेले नाते पुन्हा जिवंत करतो…
कोकणच्या हिरव्यागर्द वातावरणात सगळीकडे बाप्पाच्या आगमनाची लगबग सुरू आहे. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत… सर्वजण व्यस्त आहेत. वर्षभराची प्रतीक्षा संपवून अखेर कोकणचा प्राण असलेला गणेशोत्सव सुरू झाला आहे. कामानिमित्त देशाच्या कानाकोपऱ्यात गेलेला चाकरमानी जेव्हा या दिवसांत आपल्या मूळ गावी निघतो, तेव्हा संपूर्ण कोकणाचे रूपच बदलून जाते. मुंबई-पुण्याहून यंदाही विक्रमी संख्येने लोक आपल्या गावाकडे दाखल झाले असून, ओस पडलेली वस्त्यांमधील घरे पुन्हा एकदा गजबजली आहेत. वर्षभर बंद असणाऱ्या जवळपास पंच्याण्णव टक्के घरांची कुलपे उघडली असून, ही कौलारू घरे एखाद्या नववधूसारखी सजली-धजली आहेत. कालपर्यंत शांत असणाऱ्या पायवाटांवर आता लहान मुलांचा किलबिलाट आणि हाकारे-कुकारे उमटू लागले आहेत.
दरवर्षीप्रमाणे यंदाही महागाईची किनार या उत्सवाला नक्कीच आहे; पण कोकणवासीयांच्या उत्साहापुढे महागाईचे सावट फिके पडतेच. कोकणी माणूस मुळातच उत्सवप्रिय… “ऋण काढून सण साजरा करू, पण बाप्पाच्या स्वागतात कोणतीही कसर ठेवणार नाही,” हीच येथील पूर्वपार चालत आलेली भावना आहे. यंदा निसर्गाचे चक्र कमालीचे बदलले आहे. दरवर्षाच्या तुलनेत पावसाची उपस्थिती कमी असली तरी शेती पूर्णपणे कोलमडलेली नाही. त्यामुळे वाईट परिस्थितीतही समाधान शोधत कोकणवासीयांनी यंदाही मोठ्या थाटात बाप्पाचे स्वागत केले आहे. या उत्सवाचा आनंद लुटण्यासाठी निघणाऱ्या भक्तांच्या वाटेत मात्र मुंबई-गोवा महामार्गाचे दुखणे कायमचे शल्य बनून उभे राहते. रस्त्याची ही अनंत रखडपट्टी संपता संपत नाही. “डेडलाईन देऊन मी थकलो आहे, आता तर मला या महामार्गाच्या उद्घाटनाला जायचीही भीती वाटते,” अशी खंत खुद्द केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली, ही या महामार्गाची विदारक वस्तुस्थिती दर्शवते.
तरीही, गणेशभक्तांचा हा खडतर प्रवास सुकर व्हावा म्हणून प्रशासनाने यावेळी मोठी कंबर कसली आहे. सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी संपूर्ण शासकीय यंत्रणा अलर्ट मोडवर आणत डिजिटल पद्धतीचा अवलंब केला आहे. सर्व विभागांचे व्हॉट्सॲप ग्रुप तयार करून आरोग्य, वाहतूक, वीज यंत्रणा, एसटी आणि अन्न सुरक्षा पथकांना २४ तास सतर्क ठेवले गेले आहे. विजेचा खंड पडू नये म्हणून रोजचा आढावा घेतला जात आहे. याशिवाय ना. नितेश राणे यांनी सोडलेली ‘मोदी एक्सप्रेस’ असो वा आ. निलेश राणे यांनी मुंबईतून सिंधुदुर्गात सोडलेली ‘शिवसेना एक्सप्रेस’, तसेच ठाणे व इतर भागांतून प्रवाशांच्या गरजेनुसार प्रायोजित केलेल्या विशेष एसटी बसेसमुळे हजारो चाकरमानी सुखरूप आपल्या गावी पोहोचू शकले आहेत. जादा रेल्वे, जादा एसटी यांची सेवाही मोठी आहेच.
रत्नागिरीत पालकमंत्री उदय सामंत आणि रायगडमध्ये पालकमंत्री भरत गोगावले यांनीही गणेशभक्तांच्या सोयीसाठी प्रशासनाला सक्त आदेश दिले आहेत. मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण राज्यात पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचे आवाहन केले आहे; परंतु कोकण हा मुळातच निसर्गाचा खरा वारसदार राहिला आहे. येथील गणेशोत्सवात निसर्गाशी असलेले अतूट नाते स्पष्टपणे दिसून येते. गणरायाच्या डोक्यावर बांधली जाणारी माटोळी ही याची मोठी साक्ष आहे. विविध प्रकारची रानफळे, रानफुले, कौंडळे, सुपारी बेडे, कांगले, बांबूच्या काठ्या आणि औषधी वनस्पतींचा वापर करून तयार केलेली आरास ही कोकणच्या पारंपरिक संस्कृतीचे दर्शन घडवते. काळाच्या ओघात नवी पिढी मॉडर्न सजावटीकडे आकर्षित होत असली, तरी प्रथा-परंपरांची संस्कृती तेवढ्याच निष्ठेने जपली जात आहे. ती मग मूर्तीशाळेतली बांधिलकी असो वा कुटुंबाने एकत्र येत गणरायाचा उत्सव साजरा करण्याची त्याची पद्धत… हजारो कोटी रुपयांची उलाढाल करणारा हा महाउत्सव कोकणच्या अर्थकारणाला आणि सामाजिक एकतेला मोठी गती देणारा ठरतो.गणेशोत्सव केवळ गणपतीची पूजा आणी भजन करण्याचा उत्सव नाही; तो मुळगाव, पूर्वज, कुलपरंपरा, घराणे, नाती आणि आपल्या मातीशी असलेले नाते पुन्हा जिवंत करण्याचे दिवस असतात.वर्षभर फोन आणि सोशल मिडीया ,हॉटसअॅपवर असलेली नाती गणपतीत प्रत्यक्ष भेटतात.
मात्र, या सर्व उत्सवी वातावरणाच्या पार्श्वभूमीवर कोकणाच्या भविष्याबाबत एक गंभीर चिंता निर्माण झाली आहे. रोजगाराचे प्रश्न, निसर्गाच्या लहरीपणामुळे संकटात सापडलेला बागायतदार आणि शेतकरी, फळांच्या हमीभावाचा तिढा आणि भेसळीचे सावट तर आहेच; पण त्याहून भयावह संकट म्हणजे कोकणाच्या उंबरठ्यावर धडकलेले अमली पदार्थांचे (ड्रग्स) वादळ. रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि ठाणे परिसरात पकडण्यात आलेले ड्रग्ज पेडलर्स आणि सप्लायर्स ही धोक्याची गंभीर घंटा आहे. शहरांमधून सुरू झालेले हे अमली पदार्थांचे नेटवर्क आता थेट कोकणातील ‘झेन-झी’ (Gen Z) म्हणजेच नव्या तरुण पिढीला आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत आहे. हे विष भविष्यात आपल्या समृद्ध आणि सुसंस्कृत तांबड्या मातीला वाळवीसारखे पोखरून टाकू शकते.
त्यामुळे, या महाउत्सवाच्या प्रसंगी विघ्नहर्त्या गणरायाच्या चरणी हेच साकडे आहे की, त्याने आमच्या बळीराजाला बळ द्यावे, कोकणातील तरुण पिढीला या व्यसनाच्या विळख्यापासून वाचवावे आणि ड्रग्जविरोधी मोहीम राबविणाऱ्यांच्या हाताला सामर्थ्य द्यावे. तांबड्या मातीचे वैभव, एकत्र परिवाराचा गोडवा… सर्व विघ्न पायदळी टाकून गणराया कोकण सर्वांगसुंदर बनवेल हे निसंशय!











