आकेरीत रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यांवर सीसीटीव्हीच्या आधारे कुडाळ पोलिसांत गुन्हा दाखल

​आकेरी:

आकेरी ग्रामपंचायत हद्दीतील आकेरी मेट येथे उघड्यावर कचरा टाकून प्रदूषण करणाऱ्यांविरोधात प्रशासनाने धडक कारवाईचे पाऊल उचलले आहे. २३ ऑक्टोबर २०२६ रोजी आकेरी मेट परिसरात टाटा ईव्ही पंच (गाडी क्रमांक GA 11A9490) या चारचाकी वाहनातून प्लास्टिकच्या पिशवीत भरलेला कचरा रस्त्यावर फेकण्यात आला होता. ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली.

​या घटनेचे फुटेज प्राप्त झाल्यानंतर आकेरी ग्रामपंचायतीच्या प्रशासक कार्लेकर मॅडम यांनी तातडीने कुडाळ पोलीस ठाण्यात धाव घेऊन दोषींविरुद्ध रीतसर कायदेशीर तक्रार दाखल केली आहे. आकेरी परिसरात बाहेरून येऊन कचरा टाकण्याच्या वाढत्या प्रकारांना आळा घालण्यासाठी ग्रामपंचायतीने नुकतेच विविध महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. या कॅमेऱ्यांच्या मदतीने आता कचरा टाकणाऱ्यांवर थेट पोलीस कारवाई केली जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

​या कारवाईत आकेरीच्या ग्रामसेवक मॅडम आणि ग्रामपंचायतीचे शिपाई परब यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच घटना घडत असताना आकेरीचे ग्रामस्थ व निसर्गप्रेमी बहुउद्देशीय संस्था सिंधुदुर्गचे कुडाळ तालुकाध्यक्ष श्री. आनंद परब यांनी संबंधित वाहनाचा व्हिडिओ काढून सतर्कता दाखवली, ज्यामुळे दोषींची ओळख पटवणे शक्य झाले. सार्वजनिक स्वच्छता राखण्यासाठी आणि पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी दाखवलेल्या या तत्परतेबद्दल आकेरी ग्रामस्थांच्या वतीने प्रशासक कार्लेकर मॅडम, ग्रामसेवक मॅडम, शिपाई परब आणि आनंद परब या सर्वांचे विशेष कौतुक केले जात आहे.