कणकवलीत गांगो मंदिर नजिक सर्व्हिस रस्त्यानजीक डंपर ला अपघात ; डंपर मागे घेताना गटारात फसला
कणकवली : शहरातील गांगो मंदिरनजिक सुरू असलेल्या एका कॉम्प्लेक्सच्या कामासाठी लागणारी खडी घेऊन आलेला ( एम. सी. टी. ९१७३ ) चा चालक डंपर सर्व्हिस रस्त्यावर डंपिंग करण्यासाठी मागे घेत असताना तेथे असलेल्या गटारात डंपरची मागील चाके फसली आणि डंपर ला अपघात झाला. मागील दोन्ही चाके गटारात फसल्याने डंपर मागे पुढे करणे शक्य होत नव्हते. त्यामुळे सर्व्हिस रस्त्यावर काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.
दरम्यान यावेळी मोठी वाहतूक कोंडी झाल्याने महामार्ग प्राधिकरणच्या अजब कारभाराबाबत वाहन चालकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत होत्या. गांगो मंदिर नजीकच्या गटारांबाबत प्राधिकरणाचे वारंवार लक्ष वेधले जात असतानाही याकडे जाणीवपूर्वक प्राधिकरण आणि ठेकेदार दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही तेथील नागरिकांनी केला आहे. त्यामुळे आता तरी शहरातील प्रलंबित कामे प्राधिकरण आणि संबंधित ठेकेदार मार्गी लावतील की असेच अपघातांचे सत्र सुरूच राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.











