भोर-शिरवळ मार्गावरील राजेवाडी (ता. खंडाळा, जि. सातारा) हद्दीत एका तरुणीचा संशयास्पद मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. अंदाजे 25 ते 30 वर्षे वयाच्या तरुणीचा मृतदेह रस्त्याच्या कडेला झाडाझुडपांमध्ये पालथ्या अवस्थेत आढळून आला. धक्कादायक बाब म्हणजे, तिच्या कपड्यांवर तसेच अंगावर मिरचीची पूड आढळली असून, चेहऱ्यावरही जखमा आहेत. या घटनेमुळे हा अपघात आहे की घातपात, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. पोलिसांनी सध्या अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, खुनाच्या संशयातूनही तपास सुरू केला आहे.
झाडाझुडपांत आढळला मृतदेह
सोमवारी सायंकाळी भोर-शिरवळ मार्गावरून जाणाऱ्या काही नागरिकांच्या निदर्शनास राजेवाडी परिसरातील निर्जन वळणावर झाडाझुडपांमध्ये मृतदेह पडलेला दिसला. त्यांनी तातडीने याची माहिती पोलिसांना (Shirwal Police Station) दिली. माहिती मिळताच शिरवळ पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेहाची पाहणी केली असता तरुणीच्या तोंडावर आणि चेहऱ्यावर जखमांच्या खुणा आढळून आल्या
कपड्यांवर मिरचीची पूड
तरुणीच्या अंगावर आणि कपड्यांवर मिरचीची पूड आढळून आल्याने प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे. तिच्या चेहऱ्यावरील जखमा आणि घटनास्थळावरील परिस्थिती पाहता, हा प्रकार अपघाती मृत्यूचा नसून घातपाताचा असण्याची शक्यता पोलिसांकडून तपासली जात आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश इंगळे यांच्या माहितीनुसार, या प्रकरणात सर्व शक्यता तपासल्या जात असून तपासाची दिशा खुनाच्या संशयातूनही पुढे नेली जात आहे. (Satara Crime News)
तरुणीची ओळख अद्याप पटलेली नाही
दरम्यान, मृत तरुणीची अद्याप ओळख पटलेली नाही. पोलिसांकडून परिसरातील बेपत्ता महिलांची आणि तरुणींची माहिती घेतली जात आहे. तिची ओळख पटवण्यासोबतच मृत्यूचे नेमके कारण आणि घटनाक्रम समोर आणण्यासाठी शिरवळ पोलिसांकडून तपास सुरू आहे. तरुणीचा मृत्यू नेमका कसा झाला? तिला घटनास्थळी आणण्यात आले होते का? आणि कपड्यांवर मिरचीची पूड कशी आली? या प्रश्नांची उत्तरे तपासातून समोर येणार आहेत.










