गणेशोत्सवात चाकरमानी गावी दाखल, पण ऐन सणात देवळे गावात भीषण पाणीटंचाई

ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष; ग्रामस्थांमध्ये उसळली संतापाची लाट
ग्रामस्थांची ग्रामपंचायत कार्यालयावर धडक; पूर्वकल्पना देवूनही जबाबदार प्रशासकीय अधिकारी अनुपस्थित; ग्रामस्थांचा आरोप

देवरूख (प्रतिनिधी):

कोकणात गणेशोत्सवाचा मोठा सण साजरा करण्यासाठी लाखो चाकरमानी मुंबई-पुण्याहून आपल्या गावी दाखल झाले आहेत. संगमेश्वर तालुक्यातील देवळे गावातही मोठ्या उत्साहात बाप्पांचे आगमन झाले असून घरे चाकरमान्यांच्या गर्दीने भरली आहेत. मात्र, अशा ऐन सणासुदीच्या आणि पावसाळ्याच्या दिवसांत देवळे ग्रामस्थांसह गावी आलेल्या चाकरमान्यांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. या गंभीर समस्येकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले असून ग्रामस्थांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली आहे.

​हंडाभर पाण्यासाठी चाकरमानी व महिलांचे हाल
देवळे गावातील सुतारवाडी, कुंभारवाडी, शिंदेवाडी यांसह अनेक प्रमुख वाड्यांमध्ये पिण्यासाठी स्वतंत्र विहीर अथवा बोअरवेलची कोणतीही व्यवस्था नाही. या सर्व वाड्या पिण्याच्या पाण्यासाठी पूर्णतः ग्रामपंचायतीच्या नळपाणी पुरवठा योजनेवर अवलंबून आहेत. सणासुदीच्या दिवसांत घरात पाहुणेरावळे, चाकरमानी हजर असताना ग्रामपंचायतीकडून नियमित पाणीपुरवठा केला जात नाही. वारंवार विनंती करूनही यावर कोणतीही ठोस अथवा सकारात्मक उपाययोजना केली गेलेली नाही. त्यामुळे उत्सव साजरा करायचा की पाण्यासाठी वणवण भटकायचे, असा उद्विग्न सवाल ग्रामस्थ उपस्थित करत आहेत.

गावातील विकासकामे, पाणीटंचाईचा प्रश्न आणि मूलभूत समस्यांवर तोडगा काढण्यासाठी ‘देवळे ग्रामविकास मंडळ, मुंबई’च्या वतीने रीतसर पत्रव्यवहार करून भेटीची वेळ मागण्यात आली होती. त्यानुसार काल गुरूवारी दि. १७ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ठीक ११:०० वाजता मंडळाचे पदाधिकारी, सदस्य आणि ग्रामस्थ निर्मल ग्रुप ग्रामपंचायत देवळे यांच्या कार्यालयात धडकले. परंतु, पूर्वकल्पना दिलेली असतानाही ग्रामपंचायत कार्यालयात एकही जबाबदार प्रशासकीय अधिकारी अथवा ग्रामविकास अधिकारी उपस्थित नव्हते.

प्रशासनाचा हा हलगर्जीपणा आणि बेजबाबदार वृत्ती पाहून उपस्थित ग्रामस्थ व चाकरमान्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. ऐन सणासुदीत चाकरमान्यांचे आणि स्थानिक ग्रामस्थांचे होत असलेले हाल अत्यंत लाजीरवाणे आहेत. गावात उद्भवलेली भीषण पाणीटंचाई त्वरित दूर करण्यासाठी युद्धपातळीवर उपाययोजना करण्यात याव्यात. या गलथान कारभाराची दखल घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी व आमदारांनी तात्काळ या प्रकरणात लक्ष घालावे; अन्यथा प्रशासनाच्या या मनमानी कारभाराविरोधात संपूर्ण ग्रामस्थ रस्त्यावर उतरतील, असा स्पष्ट इशारा संतप्त ग्रामस्थांनी दिला आहे.