यशचे देशसेवेचे स्वप्न राहिले अधुरे…..!

यशचे देशसेवेचे स्वप्न राहिले अधुरे…..

मसुरे | प्रतिनिधी

गणेशोत्सवाचा आनंद, भजनाचा गजर आणि आप्तांच्या सहवासाने फुललेल्या मालवण तालुक्यातील हिवाळे धुरीवाडीवर अचानक दुःखाचा डोंगर कोसळला आहे . मालवण तालुक्यातील हिवाळे धुरीवाडी येथील मूळ रहिवासी आणि सध्या मुंबई नालासोपारा येथे वास्तव्यास असलेला १८ वर्षीय युवक यश अनंत धुरी याचा देवकोंड पुलाजवळ गडनदीच्या पात्रात बुडून अत्यंत दुर्दैवी मृत्यू झाला. शुक्रवारी सकाळी १०:३० च्या सुमारास घडलेल्या या भीषण घटनेमुळे अवघा परिसर सुन्न झाला असून एका आशादायी, कर्तबगार तरुणाचे देशसेवेचे स्वप्न अधुरेच राहिले आहे.

गणेशोत्सवाच्या पावन पर्वासाठी यश गुरुवारीच आपल्या वडिलांसोबत मुंबईवरून मोठ्या उत्साहाने गावी आला होता. वर्षभराची ताटातूट आणि गावाची ओढ उराशी बाळगून आलेल्या यशने गुरुवारी रात्रीपासून पहाटेपर्यंत वाडीतील भजनात तन्मयतेने सहभाग घेतला. पण, हा भजनाचा स्वर आणि आप्तांसोबतचा हा सहवास त्याचा शेवटचा ठरेल, याची कल्पनाही कोणाला नव्हती.

शुक्रवारी सकाळी १० च्या सुमारास यश आपल्या शेजारच्या मित्रासोबत गडनदीपात्रातील देवकोंड परिसरात पोहण्यासाठी गेला. नेहमी शांत वाटणाऱ्या त्या पात्रात उतरल्यानंतर पाण्याच्या प्रचंड प्रवाहाचा आणि खोलीचा अंदाज यशला आला नाही आणि क्षणार्धात तो पाण्याच्या खोल गर्तेत गडप झाला. सोबत असलेला मित्र यशला डोळ्यांदेखत गायब झालेले पाहून भयभीत झाला. त्याने तशाच घाबरलेल्या अवस्थेत धावत जाऊन वाडीतील ग्रामस्थांना ही काळीज पिळवटून टाकणारी बातमी दिली.

घटनेची माहिती मिळताच हिवाळे पोलीस पाटील वीरेंद्र कदम यांनी बेळणे पोलीस दूरक्षेत्राला कळवले. आचरा पोलीस ठाण्याचे एपीआय संजय कातिवले, उत्तम वंजारे आणि सचिन करवंजे यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेकडून मदतीची वात न पाहता हिवाळे धुरीवाडी आणि गावातील ग्रामस्थांनी एका क्षणाचाही विलंब न करता स्वतः नदीच्या प्रवाहात उडी घेतली.

आपल्या गावच्या लेकराला वाचवण्यासाठी किंवा शोधण्यासाठी ग्रामस्थांनी दोन तास पाण्यात अथक शोधमोहीम राबवली. अखेर दोन तासांच्या शोधकार्यानंतर यशचा मृतदेह नदीतील गाळात रुतलेल्या अवस्थेत सापडला. जेव्हा तरुणांनी त्याचा निष्प्राण देह पाण्याबाहेर काढला, तेव्हा उपस्थितांच्या अश्रूंचा बांध फुटला.

यश धुरी याने आंबोली येथील सैनिक स्कूलमधून आपले १२ वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले होते. लष्करात भरती होऊन मातृभूमीची सेवा करण्याची त्याची प्रबळ इच्छा होती. नुकतीच त्याने नौदल आणि ‘अग्निवीर’ परीक्षेची तयारी करून परीक्षा दिली होती. अंगात खाकी किंवा पांढरी वर्दी घालून कुटुंबाचे आणि गावाचे नाव उज्ज्वल करण्याचे त्याचे स्वप्न होते. मात्र, काळाने घात केलेल्या या घातामुळे यशचे ते देशसेवेचे स्वप्न कायमचे अपूर्ण राहिले.

घटनेनंतर हिवाळे प्राथमिक आरोग्य केंद्र येथे मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. या कठीण प्रसंगी हिवाळे सरपंच रघुनाथ धुरी, माजी बांधकाम सभापती महेंद्र चव्हाण यांच्यासह गावातील सर्व ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्यात सहभाग घेतला. यश हा येथील देवस्थानचे मानकरी देवेंद्र चंद्रकांत धुरी यांचा पुतण्या होय. त्याच्या पश्चात आई, वडील, आजी, आजोबा, बहीण, काका, काकी आणि चुलत भाऊ असा मोठा परिवार असून, ऐन सणासुदीच्या दिवसांत हसतमुख यश निघून गेल्याने धुरी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

या घटनेचा अधिक तपास एपीआय संजय कातिवले यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तम वंजारे व सचिन करवंजे करत आहेत. यशच्या पार्थिवावर शनिवारी सकाळी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.