सांगलीतील तरुणावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
सावंतवाडी: लग्नाचे आमिष दाखवून वारंवार शारीरिक संबंध ठेवून नंतर लग्नास नकार दिल्याने आलेल्या मानसिक तणावातून माडखोल धवडकी बेबीवाडी येथे एका तरुणीने सिलिंग फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी संशयित आरोपी सनिकेत सतीश पाटील (वय २६ वर्षे, रा. कापूरखेड, तालुका वाळवा, जिल्हा सांगली ) याच्यावर सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात सागर भीमराव मांगले वय ५१ वर्षे, रा. लाकूडवाडी, तालुका आजरा, जिल्हा कोल्हापूर यांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, संशयित आरोपी सनिकेत पाटील याने त्यांच्या मुलीला, आश्लेषा हिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी वारंवार शरीरसंबंध प्रस्थापित केले. त्यानंतर आश्लेषा हिने त्याच्याकडे लग्नाबाबत विचारणा केली असता, त्याने लग्नास स्पष्ट नकार दिला. या अचानक झालेल्या नकारामुळे तीव्र मानसिक तणावाखाली आलेल्या आश्लेषा हिने माडखोल धवडकी बेबीवाडी येथील आपल्या भाड्याच्या घरात सिलिंग फॅनला गळफास लावून आत्महत्या केली.
घटना घडल्यानंतर या प्रकरणाची जबाबदारी आपल्यावर येऊ नये आणि कोणालाही संशय येऊ नये म्हणून संशयित सनिकेत पाटील याने कोणालाही काहीही न सांगता गळफास घेतलेल्या तरुणीला एकट्यानेच खाली उतरवून रुग्णालयात दाखल केले. हा संपूर्ण प्रकार १६ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास किंवा त्यापूर्वी घडला होता. याप्रकरणी २१ सप्टेंबर रोजी सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद क्रमांक २५१/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १०८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणातील आरोपीला अटक करण्याची तजवीज पोलिसांकडून सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम तसेच पोलीस हवालदार पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणाचा पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक श्रीमती मुळीक करत आहेत.












