आत्महत्येस प्रवृत्त प्रकरणी सांगलीच्या तरुणावर गुन्हा दाखल

सावंतवाडी :
​लग्नाचे आमिष दाखवून वारंवार शारीरिक संबंध ठेवल्यानंतर लग्नास नकार दिल्याने आलेल्या तणावातून माडखोल धवडकी बेबीवाडी येथे एका तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना महिनाभरापूर्वी घडली होती. या प्रकरणी तिच्या वडिलांनी सोमवारी २१ नोव्हेंबर रोजी दिलेल्या फिर्यादीनुसार सावंतवाडी पोलीस ठाण्यात सांगली जिल्ह्यातील एका तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सनिकेत सतीश पाटील (वय २६, रा. कापूरखेड, ता. वाळवा, जि. सांगली) असे संशयिताचे नाव आहे.

​ याबाबत सावंतवाडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माडखोल धवडकी बेबीवाडी येथील एका भाड्याच्या खोलीत ही घटना घडली होती. संशयित आरोपीने पीडित तरुणी आश्लेषा हिला लग्नाचे आमिष दाखवले होते. या आमिषाला बळी पाडून त्याने तिच्याशी वारंवार शरीरसंबंध ठेवले. मात्र, नंतर जेव्हा तिने लग्नाबाबत विचारणा केली, तेव्हा त्याने लग्नाला ठाम नकार दिला.

​लग्नास दिलेल्या नकाराच्या टेन्शनमधून आणि झालेल्या फसवणुकीच्या आघातातून तरुणीने राहत्या घरातील सीलिंग फॅनला गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली. ही आत्महत्या १६ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी घडली होती. या घटनेनंतर आरोपीने स्वतःवर जबाबदारी येऊ नये या उद्देशाने कोणालाही काहीही न कळवता तिला एकट्याने गळफासावरून खाली उतरवून रुग्णालयात नेले होते.

​या प्रकरणी मृत तरुणीचे वडील सागर भीमराव मांगले (वय ५१, रा. लाकूडवाडी, ता. आजरा, जि. कोल्हापूर) यांनी दिलेल्या तक्रारीवरून २१ सप्टेंबर रोजी सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी सनिकेत पाटील याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १०८ नुसार गुन्हा दाखल केला असून त्याच्या अटकेची तजवीज सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक मुळीक करत आहेत.