श्रावण गावाची तसेच आमदार निलेश राणे यांची सोशल मीडियावर बदनामी केल्याचा प्रकार

श्रावण सरपंच नम्रता मुद्राळे, शिवसेना विभाग प्रमुख प्रशांत परब व पदाधिकारी यांनी आचरा पोलिसात दिली तक्रार

पोलीस प्रशासनाकडून संबंधितांवर कायदेशीर कारवाई सुरू

आचरा | प्रतिनिधी : श्रावण गावात अज्ञातानी लावलेल्या बॅनरचा विपर्यास करून बॅनर एडिट करून आमदार निलेश राणे व श्रावण गावाची बदनामी केल्या प्रकरणी श्रावण सरपंच नम्रता मुद्राळे, शिवसेना विभाग प्रमुख प्रशांत परब व पदाधिकारी यांनी आचरा पोलिसात तक्रार दिली आहे. दरम्यान पोलीस प्रशासनाकडून संबंधितांविरोधात कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे.

मालवण तालुक्यातील श्रावण गवळीवाडी येथे अज्ञातांनी लावलेल्या बॅनरचा विपर्यास करून आमदार निलेश राणे तसेच श्रावण गांव तसेच गाववासीयांची सोशल मीडियावर जाणीवपूर्वक बदनामी करणाऱ्या संबंधितांवर गुन्हा दाखल करा. याबाबत तक्रार श्रावण सरपंच नम्रता मुद्राळे, शिवसेना विभाग प्रमुख प्रशांत परब यांनी आचरा, मालवण पोलिसांत दिली आहे. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख महेश राणे, तालुकाप्रमुख विनायक बाईत यांसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

तक्रारीत म्हटले आहे, श्रावण गवळीवाडी येथे अज्ञातानी लावलेल्या बॅनरचा विपर्यास करून आमदार निलेश राणे व श्रावणवासियांची बदनामी सोशल मीडियाच्या माध्यमातून करण्यात येत आहे. अज्ञातानी जो बॅनर लावला त्यात म्हटले आहे, गावातील आश्वासने पूर्ण न झाल्याने तसेच प्रलंबित कामे पूर्ण न झाल्याने यापुढे कोणत्याही पुढाऱ्याने किंवा राजकारणी यांनी गावात मत मागण्यासाठी येऊ नये, अशा आशयाचा बॅनर लावण्यात आला. या बॅनरवर आमदार निलेश राणे किंवा शिवसेना पक्षाचा कोणताही उल्लेख नव्हता. मात्र, या बॅनरचा विपर्यास करून बॅनर एडिट करून सोशल मीडियावर आमदार निलेश राणे यांची बदनामी केली जात आहे. व्हॉट्सॲप ग्रुप तसेच फेसबुक आणि इन्स्टाग्रामच्या माध्यमातून बॅनर एडिट करून प्रसारित केल्याचे पुरावेही सादर करण्यात आले आहेत. यात कुडाळ लाईव्ह ग्रुपवर गोट्या चव्हाण व बाळा पावसकर व समीर लब्दे यांच्या कडून तसेच इंस्टाग्रामवर अमर घाडी नामक व्यक्ती कडून आमदार निलेश राणे यांच्या नावे बॅनर एडिट करून बदनामी केली जात आहे. तरी संबंधितांवर तात्काळ गुन्हा दाखल करून कारवाई करावी. यां आशयाची तक्रार श्रावण सरपंच नम्रता मुद्राळे, शिवसेना विभाग प्रमुख प्रशांत परब व पदाधिकारी यांनी दिली आहे.

संबंधित व्यक्तींवर तात्काळ गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी, याबाबत तक्रार पत्र तसेच पुरावे देण्यात आले आहेत. दरम्यान, पोलीस प्रशासनाकडून संबंधितांवर कायदेशीर कारवाई सुरु करण्यात आली आहे.