राजापूर | प्रतिनिधी : राजापूर तालुक्यातील भू, कुंभारवाडी येथील एका बावीस वर्षे युवकाने व्यसनामुळे झालेल्या भांडणातून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. ऋषिकेश सुरेश कुंभार असे या युवकाचे नाव आहे.
भू गावातील कुंभारवाडी येथे राहणारा ऋषिकेश सुरेश कुंभार याला दारूचे व्यसन होते. त्या दारूच्या व्यसनातून दि. 6 ऑगस्ट 2023 रोजी रात्री नऊ वाजल्यानंतर घरी वडिलांसोबत भांडण झाले होते. वडिलांजवळ झालेल्या भांडणाचा राग डोक्यात धरून त्याने टोकाचे पाऊल उचलत रागाच्या भरात विषारी औषध प्राशन केले. बागेतील गवत फवारणीचे विषारी औषध प्राशन केल्याने अत्यवस्थ झालेल्या ऋषिकेशला घरच्यांनी व नातेवाईकांनी तात्काळ रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. मात्र त्याची प्रकृती अधिकच गंभीर बनल्याने त्याला तातडीने मुंबईला नायर रूग्णालयात पुढील उपचारांकरता दाखल करण्यात आले.
मुंबई येथील नायर रूग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते. उपचार सुरू असताना ऋषिकेश याचा मृत्यु झाला. अवघे 22 वर्षे वय असलेल्या या युवकाने टोकाचे पाऊल उचलत विष पिऊन आत्महत्या केल्याने परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकारणची नोंद मुंबई येथून राजापूर पोलीस स्थानकाकडे वर्ग करण्यात आली असून या घटनेचा अधिक तपास राजापूर पोलीस करत आहेत.












